जिल्हा बँकेतील नोकरभरती प्रकरणाला एसआयटी चौकशीने वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:41 IST2025-07-18T14:41:23+5:302025-07-18T14:41:49+5:30

चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण : माजी संचालकांचे धाबे दणाणले

SIT probe accelerates recruitment case in district bank | जिल्हा बँकेतील नोकरभरती प्रकरणाला एसआयटी चौकशीने वेग

SIT probe accelerates recruitment case in district bank

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, 'नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात 'एसआयटी "ने नेमके हेच टायमिंग साधल्याने माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया गतिमान केली असून, आणखी काही माजी पदाधिकाऱ्यांनाही लवकरच नोटीस बजावल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांची निवडणूक गेल्या आठवड्यात आटोपली. येत्या आठवडाभरात बँकेच्या नवीन अध्यक्षांची निवड होईल. एकीकडे बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली असताना नोकरभरती प्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागू नये, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका माजी अध्यक्षाने सोमवारी (दि. १४) भाजपमध्ये प्रवेश घेतल्याचीही चर्चा रंगत आहे.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकरभरती प्रकरणात काही संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आणखी काही संचालकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते. नोकरभरतीत बँकेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, माजी संचालक शेखर धोटे, संदीप गड्डमवार, दामोदर मिसार, तत्कालीन उपाध्यक्ष यशवंत दिघोरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी राजीनामा दिला होता. या राजीनाम्यामागे चौकशीचा बडगा असल्याची चर्चा होती.


जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीनंतर भाजपने अध्यक्ष पदासाठी ताकद पणाला लावली. त्यासाठीच शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. याचदरम्यान 'एसआयटी'नेही टायमिंग साधल्याने अन्य संचालकांसाठी हा इशारा असल्याची चर्चा आहे.


नोकरभरती प्रकरणी राज्य सरकारने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांची चौकशी प्रमुखपदी नियुक्त केली असून त्यांनी चौकशीचा वेग वाढविला आहे.


चौकशी अधिकाऱ्यांनी सहकार मंत्र्यांची घेतली भेट
उपविभागीय पोलिस अधिकारी तथा चौकशी अधिकारी यादव यांनी मुंबईत सहकार मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पोलिस चौकशीसाठी गेले होते. तथापि याबाबतीत कमालीची गुप्तता पाळली जात असून, सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस प्रशासनातील सूत्राने सांगितले.


'सीआयडी' चौकशी करा -सुधीर मुनगंटीवार
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवरून नोकरभरती चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली. मात्र, पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची जबाबदारी सोपवल्याने मुनगंटीवार यांनी निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून 'सीआयडी' चौकशीची मागणी केली. बुधवारी (दि. १६) त्यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना बदलण्याची विनंती केली.

Web Title: SIT probe accelerates recruitment case in district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.