शिकवणीच्या नावावर विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण; आरोपी शिक्षक हा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:47 IST2024-10-02T14:45:51+5:302024-10-02T14:47:37+5:30
Chandrapur : घडलेली घटना कुणालाही सांगितली तर आई वडिलांना मारण्याची दिली धमकी

Sexual abuse of students in the name of tuition; The accused teacher is the president of the city youth congress
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे.
अमोल लोडे हा कोरपना येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता. यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. मात्र, भीतीपोटी त्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही. दरम्यान, मंगळवारी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कोरपना शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पीडिताच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोडे याच्यावर कलम ३७६ पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी 'लोकमत'ला दिली. आणखी असे प्रकार संबंधित शिक्षकाने केल्याची माहिती तपासात उजेडात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी
लैंगिक अत्याचार केल्यानंतर शिक्षक लोडे यांनी पीडित विद्यार्थिनीला ही बाब कुणालाही सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने घाबरून ही माहिती कुणालाही दिली नाही. दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी पीडिताला विचारले असता तिथे आपबीती कथन केली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.