सुरक्षारक्षक भरती प्रक्रियेत नियमावलींचा अडथळा; बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:45 IST2024-12-16T12:44:37+5:302024-12-16T12:45:21+5:30
Chandrapur : किशोर जोरगेवार यांची सहायक कामगार आयुक्तांसोबत चर्चा

Regulations hinder security guard recruitment process; Unemployed await employment
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने विविध उद्योगांमध्ये कामगार व सुरक्षारक्षकांची नेहमी मागणी असते. मात्र, या जागा भरताना गार्ड बोर्डातील नियमावलींचा रोजगार देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. यामुळे शासनस्तरावरील अडचणी सोडवत रोजगार प्रक्रियेची गती वाढवून ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने राबवावी, अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांना केली.
यावेळी कामगार संघटनांचे नेते, कामगार प्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ. किशोर जोरगेवार म्हणाले, गार्ड बोर्डमध्ये नोंदणीकृत कामगारांना रोजगार मिळवून देणे, ही गार्ड बोर्डची जबाबदारी आहे. कामगारांच्या अडचणींना समजून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. सातत्यपूर्ण मागणी नंतर सीएटीपीएस येथील सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेबाबत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी गतीने व्हावी, यासाठी आमदार जोरगेवार यांनी ही बैठक बोलावली होती. गार्ड बोर्डाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुचविले. सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांत संबंधित कंत्राटदारांशी संपर्क साधून नोंदणी लिंक सुरू करावे. लिंक सुरू झाल्यानंतर नोंदणी करून शारीरिक चाचणी पूर्ण करावी, अशीही सूचना आमदार जोरगेवार यांनी केली.
सुरक्षारक्षकांची डिमांड पण...
- चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, नियुक्त करण्याची प्रक्रिया जाचक असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- सुरक्षारक्षासाठी पात्र उमेदवारांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न मिटवि- ण्यासाठी नियुक्तीची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी बेरोजगार उमेदवारांनी केली होती.
- आमदार किशोर जोरगेवार यांनी मागण्यांची दखल घेत सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन समस्येकडे लक्ष वेधले.