भाजपचा झेंडा धरत रवींद्र शिंदे होणार जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष
By राजेश भोजेकर | Updated: July 15, 2025 17:05 IST2025-07-15T17:04:12+5:302025-07-15T17:05:00+5:30
Chandrapur : आमदार बंटी भांगडीया आणि रवींद्र शिंदे यांच्या पडद्यामागील खेळीने काँग्रेस नेते गारद

Ravindra Shinde will be the new chairman of the district bank, holding the BJP flag.
चंद्रपूर : बँकेच्या नव्या अध्यक्षांबाबत कमालीची उत्सुकता तानली जात आहे. जुलै महिन्याच्या २९ तारखेला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. एकूणच राजकीय घडामोडी बघता बँकेवर भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या विश्वासातील व्यक्तीच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील होतील, अशी माहिती आहे निवडणुकीच्या सुरुवातीपासून बंटी भांगडिया यांनी रवींद्र शिंदे यांना हाताशी धरून फेकलेल्या राजकीय जाळ्यात काँग्रेसचे दिग्गज नेते सहज अडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही खेळी आमदार भांगडिया यांनी अतिशय संयमाने बुद्धी कौशल्याने राजकीय जाणीवेतून लढल्याची माहिती आता पुढे येत आहे. महत्त्वाची भूमिका बजावलेले रवींद्र शिंदे बँकेचा नवा अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून संजय डोंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची आतील गोटातील माहिती आहे. रविंद्र शिंदे यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केल्याने भाजपचा जिल्हा बँकेवर पहिल्यांदा ताबा मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला असून काँग्रेसचा अध्यक्षपदाचा दावा फक्त दावाच राहील, असे दिसते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता नव्या अध्यक्षाच्या निवडीवरून चांगलेच राजकारण तापत आहे. या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी चिमूरचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना जवळ घेत सुरुवातीपासून चांगलीच कंबर कसली होती. यामध्ये त्यांना अभूतपूर्व यशही मिळाले. ११ संचालक भाजप समर्थीत असल्याचा दावा केला जात आहे. इतकेच नव्हे तर यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असे चित्र निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे. निवडणूक निकालानंतर काँग्रेसनेही १२ संचालक असल्याचे सांगून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पुन्हा काँग्रेसच झेंडा फडकवेल, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे. निकालानंतर दुसऱ्यादिवशी काही संचालकांना काँग्रेसने रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहलीला नेण्यात आले. दरम्यान, अनेक राजकीय घडामोडी झाल्याची माहिती आहे. सोमवारी नागपूर येथे आमदार बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडीया आणि उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीला मुंबईत असलेल्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर याही सहभागी झाल्याचे समजते. या बैठकीमध्येच रवींद्र शिंदे यांनी खासदार धानोरकर यांना हात जोडत भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांच्याशी हात मिळवणी केल्याचे स्पष्ट केले, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या घडामोडी बघता चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजप समर्थीत संचालकांची सत्ता येईल, अशी माहितीही सूत्राने दिली. रवींद्र शिंदे यांच्यासोबत सहलीला गेलेले काही काँग्रेसचे संचालक शिंदे यांच्या सोबत जाणार असल्याचेही समजते. या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे यांनी आज दि. 15 जुलै रोजी भाजपात प्रवेश केला. आता जिल्हा बँकेची सत्ता पहिल्यांदाच काँग्रेसच्या हातातून निसटून शिंदे यांच्या रूपाने भाजपकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या हातून तेलही आणि तूपही गेले?
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासारखे सहकार क्षेत्रात ज्ञान असलेले दिग्गज नेते असताना बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार बंटी भांगडिया वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसला शत्रू आणि मित्र ओळ्खताच आला नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच काँग्रेसचा विश्वासघात केल्याची चर्चा आहे. एकूणच काय तर काँग्रेसच्या हातून तेलही गेले आणि तूपही, असेही बोलले जात आहे.