नवीन चंद्रपुरातील दाताळा-कोसाऱ्यात साकारणार पोलिसांचे प्रशिक्षण तळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:11 IST2025-07-29T17:06:54+5:302025-07-29T17:11:02+5:30
निधीचा तिढा सुटल्याने लवकरच भूसंपादन : राज्य शासनाकडून ६३ कोटी ६५ लाखांचा निधी

Police training base to be set up in Datala-Kosara in Naveen Chandrapur
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुन्या चंद्रपूरचा भौगोलिक विस्ताराची शक्यताच नसल्याने दाताळा-कोसारा मार्गावरील नवीन चंद्रपूरकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पोलिस विभागानेही येथे २०,५५ हेक्टर जमीन आरक्षित केली. मात्र, निधीअभावी आरक्षण रद्दची वेळ आली होती. दरम्यान, पोलिस महासंचालकांच्या विनंतीने राज्य सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. २५) ६३ कोटी ६५ हजार ८५ हजारांचा निधी मंजूर केला. या जागेवर आता अत्याधुनिक प्रशिक्षण तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूर शहर हे गोंडकालीन परकोटाच्या आता वसलेले आहे. जटपुरा गेट, पठाणपुरा, अंचलेश्वर व बिनबा गेटच्या आतील आणि त्याबाहेर परिसरात आता निवास व नव्या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे १९९० नंतर वाढलेली लोकसंख्या सामावून घेताना नागरी सोयी-सुविधांवर ताण पडू लागला. त्यावर पर्याय म्हणून १९९८ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने नवीन चंद्रपूर वसविण्याचा निर्णय घेतला. विकासासाठी सल्लागाराची सूत्रे म्हाडाकडे दिली. विद्यमान सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी नव्या प्रकल्पांची आखणी करून काम गतिमान केले.
परिगणनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला अहवाल
जिल्हाधिकारी भूसंपादन (सामान्य) यांनी जमिनी भूसंपादनासाठी परिगणना केली. यासाठी ४३ कोटी ६५ लाख ८६ हजार १६ रुपयांचा निधी तातडीने भरणे आवश्यक आहे. अन्यथा निधीअभावी भूसंपादन न झाल्यास जमिनीवरील आरक्षण व्यपगत होईल, असा अहवाल शासनाकडे पाठविला होता. दरम्यान, पोलिस महासंचालकांनी याबाबत विनंती केल्यानंतर शासनाने मंजुरी प्रदान केली.
तर आरक्षण रद्द झाले असते
पोलिस विभागालाही नवीन चंद्रपूर विकास योजनेत कोसारा आणि दाताळा २०.२५ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली. मात्र, निधीअभावी जमिनीची अद्याप भूसंपादन प्रक्रिया न झाल्याने आरक्षण व्यपगत होण्याची वेळ आली होती. राज्य शासनाने निधी मंजूर केला. नवीन चंद्रपूर क्षेत्रात अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत.
नवीन चंद्रपूरचे महत्त्व वाढणार
म्हाडाने पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमच्या धर्तीवर १०० एकरात अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले. याशिवाय कमी दरात घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १० हजार घरांची योजना महाप्रीत सोबत करण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुंतवणूकदारांशीही संवाद साधला होता. प्रकल्प मार्गी लागल्यास नवीन चंद्रपूरचे महत्त्व वाढणार आहे.
असा असेल अत्याधुनिक प्रशिक्षण तळ
- कोसारातील ८.३० हेक्टर आणि १ दाताळातील १२.२५ हेक्टर अशा एकूण २०.५५ हेक्टर जागेत पोलिस विभागाकडून नियोजित आराखड्यानुसार अत्याधुनिक प्रशिक्षण तळ उभारण्यात येणार आहे.
- त्यामध्ये डॉग स्कॉड ट्रेनिंग सेंटर, पोलिस 3 भरतीसाठी शारीरिक मैदान, ट्रेनिंग सेंटर, बी.डी.डी.एस. ट्रेनिंग सेंटर, इन-डोअर फायरिंग बट, पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्याकरिता शासकीय निवासस्थान, प्रशासकीय इमारती उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून विविध योजनाही राबविण्यात येणार आहे.