पर्मनंट लायसन्सच्या चाचणीचे आता होणार 'लाइव्ह रेकॉर्डिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:52 IST2025-04-10T11:52:00+5:302025-04-10T11:52:31+5:30

Chandrapur : कॅम्पच्या ठिकाणाचीही होणार रेकॉर्डिंग

Permanent license test will now be 'live recorded' | पर्मनंट लायसन्सच्या चाचणीचे आता होणार 'लाइव्ह रेकॉर्डिंग'

Permanent license test will now be 'live recorded'

परिमल डोहणे 
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
पर्मनंट लायसन्सच्या चाचणी प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या अनुषंगाने आता चाचणीची लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ किरण मोरे यांच्या नेतृत्वात सोमवार ७ एप्रिलपासून सुरू केलेला हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमामुळे पर्मनंट लायसन्सच्या चाचणीत होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसणार आहे.


दुचाकी, चारचाकी वा कोणत्याही वाहनाचे पर्मनंट लायसन्स काढताना स्किल टेस्ट द्यावी लागते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे तयार केलेल्या ग्राउंडवर ही स्किल टेस्ट होत होती. कधी काळी या टेस्टवरून पास-नापास असा वादही व्हायचा. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन कामकाज सुकर व पारदर्शी होण्यासाठी सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आरटीओ किरण मोरे यांनी पर्मनंट लायसन्ससाठी होणारी चाचणी अधिक गुणवत्तापूर्ण व पारदर्शक व्हावी, यासाठी चाचण्यांचे लाइव्ह रेकॉर्डिंग करण्याचा उपक्रम सुरू केला. त्या अनुषंगाने चाचणी ग्राउंडच्या चौफेर अद्ययावत पोर्टेबल कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पर्मनंट लायन्सन काढतानाची चाचणी ही लाइव्ह रेकॉर्डिंगमध्ये होत आहे. 


१५ दिवसांपर्यंत राहणार रेकॉर्डिंग
पर्मनंट लायसन्स काढताना केलेली रेकॉर्डिंग सहायक मोटार वाहन निरीक्षक यांना १५ दिवसांपर्यंत जतन करून ठेवायची आहे. अर्जदारांनी पर्मनंट लायसन्स चाचणीबाबत तक्रार केल्यास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष रेकॉर्डिंग तपासणी करण्यात येणार आहे. 


दलालांना बसणार आळा
आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी दलाल कार्यरत आहेत. ते वाहनधारकांना लायसन्स काढण्यासाठी भूलथापा देत हजारो रुपये उकळतात. मात्र, आता पर्मनंट लायसन्सच्या चाचणीचे लाइव्ह रेकॉर्डिंग होणार असल्याने दलालांना आळा बसणार आहे.


कॅम्पच्या ठिकाणाचीही होणार रेकॉर्डिंग
जास्तीत जास्त नागरिकांनी परवाना काढावा, यासाठी चिमूर, ब्रह्मपुरी, वरोरा, गोंडपिपरी येथे परवाना शिबिर राबविण्यात येतात. या शिबिरातही पोर्टेबल कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकॉर्डिंग होणार आहे.


"मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत पर्मनंट लायसन्स काढतानाची चाचणी गुणवत्तापूर्ण व पारदर्शक व्हावी, या अनुषंगाने पर्मनंट लायसन्सच्या चाचणीचे लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. ही रेकॉर्डिंग १५ दिवस जतन करून ठेवण्यात येणार आहे. अर्जदारांनी आक्षेप घेतल्यास अधिकाऱ्यांच्या समक्ष रेकॉर्डिंगची तपासणी करण्यात येणार आहे. ७एप्रिलपासून चंद्रपुरात हा उपक्रम सुरू केला आहे."
- किरण मोरे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Permanent license test will now be 'live recorded'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.