वर्षाला केवळ ४३६ रुपये भरा आणि दोन लाखांचा विमा मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:22 IST2025-05-15T15:22:04+5:302025-05-15T15:22:43+5:30
Chandrapur : विमा योजनेसाठी कोठे कराल अर्ज ?

Pay only Rs. 436 per year and get insurance worth Rs. 2 lakhs
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये जीवन खूप अनिश्चित झाले आहे. कधी कोणाचा मृत्यू होईल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्यानंतर कुटुंबाची फरफट होऊ नये यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. पण, प्रत्येकाची महागडा जीवन विमा खरेदी करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा लोकांसाठी केंद्र सरकारची एक योजना कामी येईल. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. या योजनेअंतर्गत लोकांना जीवन विमा प्रदान केला जातो. या योजनेची सर्वांत खास गोष्ट म्हणजे वर्षभरासाठी केवळ ४३६ रुपयेच विमा द्यावा लागतो.
४३६ रुपयांत दोन लाखांचा विमा
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, लोकांना २ लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो. या योजनेचा प्रीमियम फक्त ४३६ रुपये वार्षिक आहे. या योजनेचा उद्देश देशातील गरीब लोकांना विमा प्रदान करणे आहे.
पात्रता काय ?
१८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या विमा योजनेचा लाभ घेऊ शकते. त्याच वेळी, विमा घेणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे. आधार कार्ड, बँक पासबुक आणि ऑटो डेबिट संमतीपत्र आवश्यक आहे.
१५ ते ३० मे दरम्यान खात्यातून पैसे वळते होणार
ज्यांनी विम्यासाठी बँकेकडे कागदपत्र जोडले आहेत त्यांच्या खात्यातून वर्षभरातून एकदाच ४३६ रुपये कपात केले जातात. १५ ते ३० मे दरम्यान, खात्यातून पैसे वळते होणार आहेत. यासंदर्भात जुन्या विभाधारकांना मोबाईलवर मॅसेज आला आहे. त्यामुळे बँक खात्यात पैसे ठेवणे गरजेचे आहे.
विमा योजनेसाठी कोठे कराल अर्ज ?
योजनेसाठी अर्ज सबमिट करण्यासाठी बँकेला भेट देऊ शकता किंवा बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. पोस्ट ऑफिस बचत बँक खातेधारकांना अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिसला जावे लागेल.
वारसाला मिळतात दोन लाख
विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना योजनेचा दावा मिळतो. यात मृत्यू नैसर्गिक असो किंवा अपघातामुळे सर्व प्रकरणांमध्ये क्लेम मिळतो. यामुळे कुटुंबीयांना काही प्रमाणात का होईना, आधार मिळतो.