मुरूम घोटाळा; ८ हजार ब्रासच्या परवानगीतून २ लाख ब्रासचे झाले उत्खनन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:50 IST2025-08-04T16:50:00+5:302025-08-04T16:50:28+5:30

Chandrapur : ५०० कोटींचा महसूल बुडाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Murum scam; 2 lakh brass was mined with a permit worth 8 thousand brass | मुरूम घोटाळा; ८ हजार ब्रासच्या परवानगीतून २ लाख ब्रासचे झाले उत्खनन

Murum scam; 2 lakh brass was mined with a permit worth 8 thousand brass

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती :
बल्लारशा ते वर्धा या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुरूम भरणीसाठी घेतलेली परवानगी आणि प्रत्यक्षात झालेले उत्खनन यामध्ये मोठा फरक आढळून आला असून, शासनाचा तब्बल ५०० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप नंदोरी बु, येथील शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेत केला आहे.


शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदोरी येथील शेतजमिनीतून मुरूम उत्खननासाठी सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर या पुण्यातील कंपनीला महसूल विभागाकडून फक्त ८ हजार ब्रास मुरमाची परवानगी मिळाली होती. मात्र, ठेकेदार खुराणा याने या ठिकाणाहून २ लाख ब्रासहून अधिक मुरूम काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. परवानगीपेक्षा मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननामुळे शेतांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून, शेजारच्या शेतकऱ्यांना शेती करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीपर्यंत पोहोचणारे रस्तेही यामुळे बाधित झाले आहेत. या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे अखेर तक्रार देण्यात आल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बदखल यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला. पत्रपरिषदेला सुनील उमरे, कांताप्रसाद केवट, सुधाकर जीवतोडे, संजय ठावरी, बुद्धराज केवट, नीलकंठ वाढई, प्रमोद जीवतोडे, प्रणय उमरे, अशोक राजूरकर, प्रकाश उमरे प्रजत उमरे आदी उपस्थित होते.


या आहे मागण्या : प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, उत्खनन केलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे.


"तक्रारीवरून उत्खनन झालेल्या ठिकाणी जाऊन मोका पंचनामा केला आहे. ज्या कंपनीला परवानगी दिली. त्याच्यापेक्षा जास्त उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला आहे."
- मनोज अकनुरवार, नायब तहसीलदार, भद्रावती 

Web Title: Murum scam; 2 lakh brass was mined with a permit worth 8 thousand brass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.