मल्टीटास्किंग प्रयोग? एक प्राचार्य अन् तीन-तीन आयटीआयचा भार, रिक्त पदांचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:31 IST2025-11-11T13:30:44+5:302025-11-11T13:31:58+5:30
नागपूर विभागात गोंधळ : प्राचार्यांचा प्रशासकीय ताण वाढला

Multitasking experiment? The burden of one principal and three ITIs, the issue of vacant posts is serious
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालय, नागपूर विभागात सध्या प्राचार्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्राचार्य पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्यांकडे दोन, कधी तीन-तीन आयटीआयचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही प्राचार्याकडून विशिष्ट आयटीआय संस्थांकडे अधिक लक्ष दिले जात जात असल्याने "विशेष आयटीआय प्रेम" या नावाने नवी चर्चा रंगू लागली आहे.
शासनाने पीपीपी प्रायव्हेट पार्टनरशिप) (पब्लिक तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांच्या कामकाजासाठी "सर्वसाधारण प्राचार्य" ही पदे निर्माण केली आहेत. तरीसुद्धा अतिरिक्त कार्यभार असलेले प्राचार्य या संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचे बोलले जात आहे. प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे नुकतेच रुजू झालेले सहसंचालक पी. टी. देवतळे यांनी पदभार स्वीकारताच रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार तब्बल २५ प्राचार्यांना एकापेक्षा जास्त आयटीआयंचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. विशेष म्हणजे, एका जिल्ह्यातील प्राचार्यांना दुसऱ्या जिल्ह्यातील आयटीआयचा पदभार देण्यात आल्याने या प्राचार्यांची दमछाक होत आहे.
कामकाजावर विपरीत परिणाम
एकाच व्यक्तीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या दिल्याने आयटीआयच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर, विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि औद्योगिक समन्वयावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शिक्षक व कर्मचारी वर्गात व्यक्त केली जात आहे.
भविष्यातील उपाययोजना आवश्यक
शासनाने प्राचार्याच्या रिक्त पदभरतीची प्रक्रिया त्वरित राबविणे गरजेचे आहे. अतिरिक्त कार्यभाराचे प्रमाण मर्यादित ठेवणेही महत्त्वाचे आहे. सोबतच ज्या जिल्ह्यातील प्राचार्य आहे त्याच जिल्ह्यातील अन्य संस्थांचा पदभार देणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यातील प्राचार्याकडे दुसऱ्या जिल्ह्यातील आयटीआयचा पदभार दिल्याने कुठे लक्ष द्यावे, असा प्रश्नही या प्राचार्यांना पडला आहे.
जिल्हानिहाय पदभार असलेले प्राचार्य
नागपूर - ९ प्राचार्याना २२ संस्था
वर्धा - ४ प्राचार्यांना १२ संस्था
भंडारा - ३ प्राचार्यांना १२ संस्था
चंद्रपूर - ६ प्राचार्यांना १८ संस्था
गोंदिया - ३ प्राचार्यांना ७ संस्था