एमपीएससीचा अघोषित धक्का ! फक्त दोन दिवस आधी परीक्षेची नोटिफिकेशन

By परिमल डोहणे | Updated: August 13, 2025 17:30 IST2025-08-13T17:29:30+5:302025-08-13T17:30:17+5:30

हजारो उमेदवारांची स्वप्ने चुरगाळली : परीक्षेला दोन दिवस असताना जाहीर केले वेळापत्रक

MPSC's unannounced shock! Exam notification just two days before | एमपीएससीचा अघोषित धक्का ! फक्त दोन दिवस आधी परीक्षेची नोटिफिकेशन

MPSC's unannounced shock! Exam notification just two days before

चंद्रपूर : सरकारी नोकरीचे स्वप्न डोळ्यांत ठेवून वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या उमेदवारांवराची एमपीएससीने जणू चेष्टा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील गट-अ संवर्गातील पदभरतीची परीक्षा केवळ दोन दिवस आधी जाहीर करून उमेदवारांना अक्षरशः धावपळीत ढकलले. १३ ऑगस्ट २०२५ ला मुंबई येथे परीक्षेचे नियोजन केले असताना याबाबतची अधिसूचना ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली. त्यामुळे दोन दिवसांत रिझर्व्हेशन करायचे कसे, जायचे कसे, असा प्रश्न परीक्षार्थ्यांना पडला. अनेकांना तर हॉलतिकीट काढून जाणे शक्यच झाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत उपसंचालक तंत्र शिक्षण, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरतीकरिता आयोगामार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. २३ जुलै २०२५ च्या शुद्धिपत्रकानुसार २४ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान उमेदवारांना अर्ज करण्यास पुन्हा संधी दिली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नव्या जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान तब्बल दोन वर्षे कोणत्याही प्रकारची अधिसूचना न काढता ११ ऑगस्ट २०२५ ला अधिसूचना काढून १३ ऑगस्टला मुंबई येथे परीक्षेचे नियोजन केले. मात्र, या परीक्षेला विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांतील पात्रताधारकांना वेळेवर मुंबईला पोहोचणे शक्य नव्हते. परिणामी, अनेक जण परीक्षेपासून वंचित राहिले.


अनेक जण परीक्षेपासून वंचित

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया विदर्भातील या जिल्ह्यातील तरुणांना मुंबई जाण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात सोय नाही. एक- दोन रेल्वे आहेत. मात्र, सण-उत्सवामुळे त्यांचे रिझर्व्हेशन फुल झाले आहे. अशातच १३ ला परीक्षा असताना ११ नोटिफिकेशन आले. त्यामुळे काहींनी ११ ऑगस्टला, काहींनी १२ ऑगस्टला हॉलतिकीट काढले. मात्र, दुसऱ्या दिवशीच पेपर असल्याने जायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला. विमानाने जाणे परवडणारे नसल्याने अनेकांनी परीक्षाच दिली नाही.
 

पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी
ऐन वेळेस परीक्षा जाहीर केल्याने दूरवरील गावातील तरुणांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे आजपर्यंतचे बघितलेले स्वप्न भंग पावले आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.


"मी अर्ज करून परीक्षेची तयारीसुद्धा केली होती. एमपीएससीने १३ ऑगस्टला परीक्षा जाहीर केली व त्याबाबतची अधिसूचना ११ ऑगस्ट रोजी साइटवर पब्लिश केली. एवढ्या कमी कालावधीत मी मुंबईला पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. शासनाने पुन्हा परीक्षा घेऊन जे वंचित आहेत, त्यांना न्याय द्यावा."

- मनोज बसेशंकर, चंद्रपूर

Web Title: MPSC's unannounced shock! Exam notification just two days before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.