एमआयडीसी नावालाच; जिल्ह्यातील युवक रोजगारासाठी परराज्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:08 IST2025-05-02T16:07:24+5:302025-05-02T16:08:57+5:30

मूल तालुक्यातील वास्तव : रोजगारासाठी भटकंती

MIDC in name only; Youth of the district go out of state for employment | एमआयडीसी नावालाच; जिल्ह्यातील युवक रोजगारासाठी परराज्यात

MIDC in name only; Youth of the district go out of state for employment

धनराज रामटेके 
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल:
तालुक्यात आकापूर-मरेगाव स्थित एमआयडीसी आहे. मात्र, मागील ३० वर्षाचा कालावधी लोटूनही अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने आजही तालुक्यातील युतकांच्या हाताला काम नाही. परिणामी, तालुक्यात बेरोजगार युवकांची फौज निर्माण झाली आहे. उद्योगाअभावी युवक बेरोजगारीच्या खाईत जात असून, रोजगारासाठी युवकांचे बाहेर राज्यात स्थलांतर होत आहे. 


मूल तालुक्यात जोमाने विकास होत असतानाच अपुऱ्या सिंचन सोयीसुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटांना सामोरे जातानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे. त्यामुळे युवकांचा ओढा औद्योगिक शिक्षणाकडे वळला. तालुक्यात एमआयडीसी असल्याने मोठमोठे उद्योग धंदे स्थापन होतील व आपल्या हाताला काम मिळेल, या आशेने अनेक युवकांनी तांत्रिक शिक्षण घेतले. मात्र एमआयडीसी स्थापनेला ३० वर्षे होऊनही पाहीजे तेवढे उद्योग नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. 


केवळ दोन-तीन उद्योग सुरू
रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी आकापूर मरेगाव स्थित औद्योगिक महामंडळातील भूखंडाचे वाटप करण्यात आले. मात्र, अनेक वर्षे लोटूनही उद्योजकांनी उद्योगधंदे उभारले नाहीत. आजच्या स्थितीत केवळ दोन-तीन उद्योग सुरू आहेत. इतर उद्योग सुरू व्हावेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही.


बेरोजगार तरुण वाममार्गाकडे
हजारो सुशिक्षित युवकांचा हाताला काम नाही. परिणामी, शिक्षणाच्या बाजारीकरणात गुरफटल्या गेलेल्या सुशिक्षित ग्रामीण बेरोजगार युवकांचा प्रश्न ऐरणीवर असून, हजारो युवक नैराश्येत जाऊन झटपट पैसा कमविण्याच्या नादात वाममार्गाला लागले असल्याचे भयावह चित्र तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे.


"मूल तालुक्यातील आकापूर मरेगाव स्थित एमआयडीसीत अपेक्षित उद्योगाअभावी बेरोजगारांची संख्या वाढली. जे उद्योग सुरू आहेत त्यात स्थानिकांना डावलून परराज्यातील मजुरांचा भरणा केला आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळेल यासाठी मोठमोठे उद्योग स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे."
- संदीप मोहुर्ले, बेरोजगार युवक, मूल


 

Web Title: MIDC in name only; Youth of the district go out of state for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.