जंगलात बांबू तोडायला जाणे जीवावर बेतले, वाघाने झडप घालून केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:12 IST2023-06-16T11:09:40+5:302023-06-16T11:12:57+5:30
चंद्रपूरच्या चिटकी जंगलातील घटना

जंगलात बांबू तोडायला जाणे जीवावर बेतले, वाघाने झडप घालून केले ठार
सिंदेवाही (चंद्रपूर) : तालुक्यातील शेवटचा टोक असलेल्या चिटकी (मुरपार) या घनदाट जंगलात नवेगाव येथील युवक बांबू तोडण्यासाठी गेला होता. दरम्यान, झुडपामध्ये लपून बसलेल्या वाघाने हल्ला करीत त्याला जागीच ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
रघुनाथ नारायण गुरनुले (३२, रा. नवेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. रघुनाथ हा दुपारी ३ वाजताच्या सुमारास एफडीसीएम बीट नंबर १७२ या हद्दीत बांबू तोडण्याकरिता गेला होता. त्याच दरम्यान लपून असलेल्या वाघाने झडप घालून मान जबड्यात पकडून ठेवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. एफडीसीएम, वनविभाग, पोलिस विभागाला कळविली. त्वरित सर्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकारी व पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवीत त्यांना शांत केले व पंचनामा केला.
तीन वर्षांपूर्वीच झाले होते रघुनाथचे लग्न
रघुनाथ रोज शेतावर जात होता. भाजीपाला पिकवून आठवडी बाजारात नेत होता. तीन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. अद्याप त्यांना अपत्य झाले नव्हते. आई-वडील सोबत राहत होते. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याने नवेगाव येथे शोककळा पसरली आहे. मृत रघुनाथच्या मागे पत्नी व आई-वडील आहेत. विशेष म्हणजे या घटनेबाबत माहिती विचारण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी जंदीलवार यांना संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल स्विच ऑफ होता. पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण, वनविभागाचे अधिकारी सालकर व वनकर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.