प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विकल्यास परवाना होईल निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:24 IST2025-01-27T15:24:23+5:302025-01-27T15:24:54+5:30
Chandrapur : अन्न व औषध प्रशासनातर्फे केली जाते तपासणी

License will be suspended if medicine is sold without a prescription
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्रीवर बंदी आहे; परंतु या नियमांचे उल्लंघन करून अनेक औषध विक्रेते औषधांची विक्री करतात. गत वर्षभरात अशा १४ जणांवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करत परवाना निलंबित केला आहे. त्यामुळे त्यांना विना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे चांगलेच भोवले आहे.
सर्दी-खोकला किंवा इतर कोणताही आजार असो, अनेक जण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध विक्रेत्याकडे जाऊन औषधी घेत त्याचे सेवन करतात; परंतु डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठलेही औषधी देणे हे नियमबाह्य आहे. त्यात अशाप्रकारे औषधी खाल्ल्याने रुग्णांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती असते. काही औषधांच्या साईड इफेक्टमुळे गंभीर परिणाम देखील होण्याची शक्यता असते.
त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी औषध विक्रेत्यांकडील व्यवहारांची, कागदपत्रांची तपासणी केली जाते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनाशिवाय औषधी देणे असो किंवा इतर नियमांचे उल्लंघन करणे असो अशात कोणी औषध विक्रेता दोषी आढळला तर त्याचा परवाना निलंबित करून मेडिकल चालकावर कारवाई करण्यात येते. चंद्रपूरचे सहायक आयुक्त (औषधी) मनीष चौधरी यांच्या नेतृत्वात वर्षभरात १४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
वर्षभरात १४ मेडिकलचे परवाने केले निलंबित
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने औषध विक्रेत्यांच्या दप्तरांची तपासणी केली जाते. कायद्याचे उल्लंघन केलेले आढळले तर कारवाई केली जाते. मागील वर्षभरात विना प्रिस्क्रिप्शन औषधी देणाऱ्या १४ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी देण्यास मनाई
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्री करण्यास औषध विक्रेत्यांना कायद्याने मनाई करण्यात आलेली आहे. असे कृत्य केले तर कारवाई होते
"अन्न व औषध विभागामार्फत मेडिकल दुकानाची तपासणी केली जाते. विना प्रिस्क्रिप्शन वा इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कारवाई केले जाते. मागील वर्षी विना प्रिस्क्रिप्शन औषधे देणाऱ्या १४ मेडिकलचे परवाने रद्द केले."
- मनीष चौधरी, सहायक आयुक्त (औषधी), चंद्रपूर