एसटी कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र असणे आता बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:57 IST2025-05-09T14:56:55+5:302025-05-09T14:57:27+5:30

प्रादेशिक व्यवस्थापकांच्या सूचना : कारवाई होणार

It is now mandatory for ST employees to have an identity card around their necks. | एसटी कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र असणे आता बंधनकारक

It is now mandatory for ST employees to have an identity card around their necks.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर:
सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर येताना ओळखपत्र घालून येणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश कर्मचारी ओळखपत्र घालून येत नसल्याची बाब एसटी महामंडळाच्या लक्षात आली. एसटी महामंडळाच्या प्रदेश कार्यालयाने २५ एप्रिल रोजी पत्र काढले आहे. त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यावर असताना गळ्यात दर्शनी भागावर ओळखपत्र घालणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.


विविध प्रशासकीय कामांसाठी नागरिक, प्रवासी, विद्यार्थी एसटीच्या कार्यालयात जातात. विशेष करून विभागीय व प्रदेश कार्यालयात मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतात. एसटी चालक व वाहकाला गणवेश असतो, तसेच गणवेशावर असलेल्या नावाच्या पट्टीवरून त्याची ओळख पटत असते. मात्र, कार्यालयातील प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना गणवेश नाही. इतर कार्यालयांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र घालणे बंधनकारक आहे, याची आठवण २५ एप्रिलच्या पत्रातून करून देण्यात आली आहे. 


ओळखपत्रासाठी कर्मचारी सांगतात असे बहाणे
आयकार्ड घरीच राहिले, आयकार्डची लेस तुटली आहे, आयकार्ड पॅन्टच्या खिशात ठेवले आहे. असे बहाणे कर्मचारी सांगतात. आयकार्ड घालूनच प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यावर उपस्थित असणे आता मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्याने ओळखपत्र घालणे हा कार्यालयीन शिस्तीचा भाग आहे. मात्र, ओळखपत्र घातले जात नसल्याने कार्यालयाची शिस्त आणि नियम तोडले जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 


कारवाई होणार
प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याने दर्शनी भागावर ओळखपत्र घालणे आवश्यक आहे. ओळखपत्र न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.


तक्रारीनंतर ओळखपत्र बंधनकारक
एसटी महामंडळातील कर्मचारी, अधिकारी ओळखपत्र लावत नसल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने प्रदेश कार्यालयात केली. या तक्रारीची दखल घेत सर्व विभागीय कार्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार एसटी कर्मचाऱ्याने ओळखपत्र घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.


विभाग नियंत्रकांना आले पत्र
प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयात ओळखपत्र घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाद्वारे सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठविण्यात आले आहे. यानंतर विभागीय नियंत्रकांनी सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र घालून येणे बंधनकारक केले आहे.

Web Title: It is now mandatory for ST employees to have an identity card around their necks.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.