काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना 'फेक' निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:24 IST2025-03-11T11:23:24+5:302025-03-11T11:24:59+5:30

Chandrapur : पोलिस काडतूस केसचा शोध घेणार

Incident of firing at Congress leader's house turns out to be 'hoax' | काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना 'फेक' निघाली

Incident of firing at Congress leader's house turns out to be 'hoax'

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस (चंद्रपूर) :
घुग्घुस येथील काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार झाल्याचे वृत्त ऐकून जिल्हा हादरला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पोलिसाच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर गोळीबाराची घटना ऐकून खुद्द पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका घटनास्थळी धावून गेले. वेगाने तपासाची चक्रे फिरली. मात्र पोलिस तपासात गोळीबार झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. घटनास्थळी काडतुसाची रिकामी केस सापडली असली तरी गोळीबाराची घटना अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान काडतुसाची रिकामी पुंगळी कुठून आली, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.


राजू रेड्डी यांच्या घरी पहिल्या माळ्यावर अनुपसिंह चंदेल भाड्याने राहतात. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमाराला चंदेल यांच्या व्हरांड्यात काडतुसाची रिकामी केस सापडली. यावरून चक्क रेड्डी यांच्या घरावर गोळीबार झाल्याची अफवा पसरली. नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आदी घटनास्थळी पोहोचले. तथापि घटनास्थळाच्या तपासणीत पोलिसांना गोळीबाराच्या कुठल्याही खुणा आढळून आल्या नाहीत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात गोळीबारच झाला नसल्याचे पुढे आले आहे. दरम्यान या गुन्ह्यात बॅलेस्टिकतज्ज्ञांना पाचारण केले जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतर काडतुसाच्या केसचा गुंता सुटणार आहे. गोळीबाराची घटना ही अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवून लोकांमध्ये भीती निर्माण करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस काडतूस केसचा शोध घेणार
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, गोळीबाराचे कोणतेही फुटेज आढळले नाही. तसेच, गोळी झाडल्याचा कोणताही आवाज ऐकला गेल्याचे पुरावेही समोर आलेले नाहीत. मात्र, घटनास्थळी काडतुसाची रिकामी केस सापडल्यामुळे ती केस नेमकी कुठून आली, हे शोधण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.


"प्राथमिक तपासात संबंधित ठिकाणी गोळीबार झाल्याचे कुठलेही चिन्ह दिसून आले नाही. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरवून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नये."
- सुदर्शन मुम्मका, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर.

Web Title: Incident of firing at Congress leader's house turns out to be 'hoax'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.