चंद्रपूर जिल्ह्यात ३६१ सामान्य, तर ४६ गर्भवती एचआयव्ही संक्रमित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:45 IST2024-07-04T13:43:48+5:302024-07-04T13:45:09+5:30
Chandrapur : एप्रिल ते मे २०२४ मध्ये करण्यात आल्या १९ हजार १८३ सामान्य एचआयव्ही तपासण्या

In Chandrapur district, 361 normal, 46 pregnant HIV infected!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील वर्षी २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात १ लाख ९१५ एचआयव्ही चाचण्या झाल्या. त्यामध्ये २९७ सामान्य संक्रमित, तर ४६ हजार ९९६ गरोदर मातांमध्ये ३२ माता संक्रमित असल्याचे आढळून आले. एप्रिल ते मे २०२४ मध्ये १९ हजार १८३ सामान्य एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ६४, तर ८ हजार ६८७ गरोदर मातांमध्ये १४ महिला संक्रमित आढळल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या त्रैमासिक आढावा बैठकीत समोर आली.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची निहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दीपक बानाईत, महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, डॉ. पराग जीवतोडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, वैद्यकीय अधिकारी एआरटी डॉ. श्रीकांत जोशी, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, नसीमा शेख अनवर, देवेंद्र लांजे उपस्थित होते.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. बैठकीला राज काचोळे, रोशन आकुलवार, गोपाल पोर्लावार, माधुरी डोंगरे, विहान प्रकल्पाच्या संगीता देवाळकर आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मोफत बस पास योजना
जिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्या दिशेने कार्य करण्याच्या सूचना विवेक जॉन्सन यांनी दिल्या. एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी शासनाची मोफत बस पास योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.