जास्त प्रवासी असल्यास ट्रॅव्हल्सवर कारवाई होते तर मग एसटीवर का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:06 IST2025-05-08T15:03:33+5:302025-05-08T15:06:23+5:30
लग्नसराईमुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली : महिलांना अर्धे टिकीट

If there are too many passengers, action is taken against Travels, then why not against ST?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खासगी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी दिसले तर आरटीओ, तसेच वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, असेच प्रवासी 'लालपरी'त दिसून आले तर कारवाई होताना दिसून येत नाही. सद्यःस्थितीत महिलांना अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येत असल्यामुळे लालपरीत मोठी गर्दी होत आहे.
शाळा - महाविद्यालयांना नुकत्याच सुट्ट्या लागल्या त्यामुळे अनेकजण फिरायला तसेच गावाला जाण्याचा प्लॅन करतात. लग्नसराई सुरू असल्याने लालपरीमध्ये मोठी गर्दी दिसून येते. बऱ्याच लालपरीत तर साधी उभे राहायलासुद्धा जागा मिळत नाही. परंतु, अशीच स्थिती जर खासगी ट्रॅव्हल्समध्ये असली तर त्या वाहनावर दंड केला जातो. मग लालपरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी बसवले जातात. त्याच्यावर कारवाई केली जाते का, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. याकडे मात्र साऱ्याच अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
एसटी बसेस कमी, प्रवासी जास्त
चंद्रपूर विभागात चार आगार येतात. मात्र, या आगारात पाहिजे त्या प्रमाणात बस नाही. त्या तुलनेत प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बस कमी व प्रवासी जास्त अशी स्थिती आहे.
चालक-वाहकाचे ऐकतो कोण ?
बसमधील गर्दी बघून नेहमीच चालक-वाहक प्रवाशांना मागून येणाऱ्या बसमधून प्रवास करण्याच्या सूचना देतात. मात्र, कोणताच प्रवासी चालक-वाहकाचे ऐकत नाही..
सर्वाधिक प्रवासी नागपूर मार्गावर
सद्यःस्थितीत सर्वाधिक प्रवासी चंद्रपूर-नागपूर मार्गावर, तसेच चंद्रपूर गडचिरोली मार्गावर असतात.
बसफेऱ्या वाढविण्याची होतेय मागणी
चंद्रपूर विभागातील प्रत्येकच आगारात बस संख्या कमी आहेत. त्यामुळे कमी बसफेऱ्यांमुळे ग्रामीण भागात बोटावर मोजण्याइतक्या बस धावतात. परिणामी त्यांना प्रवास करण्यासाठी बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत असल्याचे दिसून येते.
एप्रिलमध्ये विभागाच्या उत्पन्नात बरीच वाढ
उन्हाळच्या सुट्ट्या लागल्याने तसेच लग्नसराईमुळे बसमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रपूर विभागाच्या उत्पन्नात बरीच वाढ झाल्याचे दिसून येते.