रेशन कार्ड हरवले, तर मिळणार ई-रेशन कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:28 IST2024-09-05T12:28:20+5:302024-09-05T12:28:54+5:30
अडचण दूर होणार : ई-रेशनकार्डसाठी नवी प्रणाली जाहीर

If the ration card is lost, you will get an e-ration card
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सरकारी स्वस्त धान्यासाठी तयार केलेले रेशन कार्ड हरवल्यास आता शासनाकडून ई- रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने एक नवी प्रणाली तयार केली. या प्रणालीचा वापर करून प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ई- रेशन कार्ड तयार करता येते, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रेशन कार्ड योजनेचा फायदा कित्येक गरीब कुटुंबीयांना होत आहे. आता जुने रेशन कार्ड हरवल्यास त्या जागी ई- रेशन कार्ड सुरू करण्यात आले. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई- रेशन कार्डद्वारे धान्य खरेदी करता येणार आहे. ई- रेशन कार्डमुळे कार्डमधील नाव कमी करणे, नोंदवणे, ट्रान्सफर करणे, अशी कामे करण्यासही मदत होणार आहे. राज्यात ई- रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली. पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सर्व रेशन कार्ड ई- कार्डमध्ये रूपांतरित करण्याची तयारी झाली. यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली. पुरवठा विभागात प्रायोगिक स्तरावर या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे.
ई- रेशन कार्ड कोणाला मिळणार?
शिधापत्रिका हरवल्यास डुप्लिकेट शिधापत्रिका बनवण्यासाठी एक ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. रेशन दुकान किंवा अन्न विभाग कार्यालय किंवा किओस्क सेंटरमधून अर्ज मिळेल. दिलेल्या लिंकवरून डुप्लिकेट रेशन कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठी अर्ज डाउनलोड करू शकता. रेशन कार्ड डुप्लिकेट फॉर्म पीडीएफ हा फॉर्म फूड सेफ्टी पोर्टलवर मिळवू शकता. अर्ज प्राप्त केल्यानंतर, तो अर्ज काळजीपूर्वक भरा. रेशन कार्ड क्रमांक, शिधापत्रिकेत नोंद केलेले कुटुंबप्रमुखाचे नाव, वडील व आईचे नाव, मोबाइल नंबर इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.
३,५०,००० रेशन कार्डधारक जिल्ह्यात
- चंद्रपूर जिल्ह्यात ३ लाख ५० हजार रेशन कार्डधारक आहेत.
- या कार्डधारकांना सरकारी धान्य दुकानातून नियमांनुसार धान्याचा लाभ दिला जातो.
रेशन कार्ड हरवले तर करा ऑनलाइन अर्ज
यापूर्वी जुन्या रेशन कार्डबाबत अनेक तक्रारी निर्माण झाल्या होत्या. जुने रेशन कार्ड असल्यामुळे ते मळकट होणे, हरवणे, फाटणे, त्यावरील नावे पुसून जाणे, अशा कित्येक गोष्टी रेशनधारकांना अडचणीच्या ठरत होत्या. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नोंद घ्यावी यासाठी ई-रेशन कार्ड प्रणाली सुरू झाली आहे. याचा फायदा नागरिकांना होणार आहे.