"फाशी घेईन, चिठ्ठीत नाव लिहीन!" : फसवणुकीनंतर आरोपी महिलेची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:14 IST2025-08-05T19:13:21+5:302025-08-05T19:14:06+5:30

चोराच्या उलट्या बोंबा : एका आरोपीसह महिला ताब्यात

"I will hang myself, I will write my name in the note!": Threat of accused woman after cheating | "फाशी घेईन, चिठ्ठीत नाव लिहीन!" : फसवणुकीनंतर आरोपी महिलेची धमकी

"I will hang myself, I will write my name in the note!": Threat of accused woman after cheating

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर :
तुमच्या पतीला वेकोलिमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून शहरातील दोन महिलांना १० लाखांनी गंडविल्याची घटना सोमवारी (दि. ४) उघडकीस आली. पीडित महिलांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी रविवारी (दि. ३) एका आरोपीसह महिलेस ताब्यात घेतले. नीलेश कवडूजी मोहुर्ले (४०, रा. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. बल्लारपुरातील आरोपी महिलेचे नाव पोलिसांनी अद्याप उघड केले नाही.


बल्लारपुरातील तक्रारदार महिला जयश्री दुबे, पती श्रवण दुबे आणि तिचा दीर शुभम मिश्रा (रा. बनारस) हे गोकुळ नगरात राहतात. आरोपी महिला त्यांच्या घराशेजारीच १५ वर्षांपासून राहते. एकाच वॉर्डात असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली. आरोपी महिलेने नागपुरातील नीलेश मोहुर्ले याच्या माध्यमातून जयश्री दुबे हिच्या पतीला वेकोलित नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वेकोलिच्या अधिकाऱ्यांची ओळख असल्याची बतावणी केली. जयश्रीने विश्वास ठेवल्याने आरोपी महिला व मोहुर्ले याने १२ लाखांची मागणी केली. मात्र, एकाचवेळी ही रक्कम अशक्य वाटल्याने टप्प्याटप्याने ५ लाख रुपये दिले. नोकरीचा आदेश कधी मिळणार, अशी विचारणा करताच आरोपींनी खरा रंग दाखवणे सुरू केले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी रविवारी (दि. ३) महिला व नीलेश मोहुर्ले याला ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता ३१८ (४), ३१५ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत. 


आरोपी म्हणाला... नागपूरचे डॉन माझे मित्र !
बल्लारपुरातीलच दुसऱ्या प्रकरणात मीनाक्षी बिरे या महिलेच्या पतीला नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आरोपींनी ५ लाख रुपये लुबाडले होते. मात्र, नोकरी दिलीच नाही. पीडित बिरे कुटुंबाने पैसे परत मागितले असता आरोपी नीलेशने पोलिस आयुक्त व नागपूरचे डॉन माझे मित्र आहेत. पोलिसही माझे काही वाकडे करू शकत नाहीत, अशी धमकी दिल्याची तक्रार मीनाक्षी बिरे या महिलेने केली आहे.


पैसे परत मागितल्याने आरोपीने दिली आत्महत्येची धमकी
पैसे परत मागितल्याने आरोपी महिलेने 'फाशी घेईन आणि चिठ्ठीत तुमचे नाव लिहीन' या शब्दात आत्महत्येची धमकी देत दबाव टाकल्याचेही दोन्ही महिलांच्या तक्रारीत नमूद केले आहे. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. नोकरीच्या नावावर आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर तक्रार करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Web Title: "I will hang myself, I will write my name in the note!": Threat of accused woman after cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.