"पोलीस व्हायचंय, पण मैदान नाही!" : युवक रस्त्यावर जीव धोक्यात घालून सरावात मग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:12 IST2025-08-14T17:10:29+5:302025-08-14T17:12:11+5:30
युवक म्हणतात मग जायचे कुठे? : चंद्रपूरचे काही युवक बल्लारपूरकडे तर काही मूल मार्गावर करतात सराव; ग्रामीण भागातही हीच स्थिती

"I want to be a police officer, but there's no field!": Youth risks his life on the streets to practice
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा क्रीडा संकुलात प्रचंड गर्दी असते, पण सराव केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काही युवक बल्लारपूरकडे तर काही मूल मार्गावर सकाळी सराव करतात. मीदेखील जिवाची पर्वा न करता सकाळी धावतो. मग जायचे कुठे, असा सवाल चंद्रपूरचा प्रशांत सव्वालाखे याने विचारला. बुधवारी (दि. १३) सकाळी 'लोकमत'ने युवकांना बोलते केले असता काहींनी क्रीडा धोरणांवरही बोट ठेवले आणि गडचिरोलीतील अपघात बळी गेलेल्या त्या चार दुर्दैवी विद्यार्थ्यांची आठवण दिली.
बल्लारपूर मार्गावर आपल्या मित्रांसोबत सकाळी दररोज धावणारा विवेक नागरकर हा युतक 'थोडे तुम्हीही आता वेग वाढवा' अशी सूचना करून बोलू लागला... गडचिरोलीची घटना वाईटच होती सर... पण पोरं करणार तरी काय? जिल्हास्थळी थोड्या सुविधा आहेत. पण, पुरेशा नाहीत. चंद्रपूरचे स्टेडियमच बघा ना । सकाळी किती गर्दी असते, मग आम्ही धावणार तरी कुठे? असा प्रश्न विचारताच मनोज जांभुळे म्हणाला, अबे समोर बघ ट्रक येत आहे मग हे युक्क लगेच रस्त्याच्या बाजूला झाले आणि डिप्स मारू लागले. मंगळवारी (दि. १२) मूल मार्गावर असाच अनुभव आला. काही युवक चंद्रपूर-मूल मार्गावर धावतात. रस्ता अरुंद आहे ना, हा प्रश्न विचारल्यानंतर आशिष ढोबळे म्हणाला, खरे आहे. पण, ग्राऊंड नसेल दुसरा पर्याय काय? काही मुले नागपूर मार्गावर धावतात. मित्रांना धोका होऊ नये, म्हणून एका युवकाने खिशात शिट्टी ठेवली होती. वाहने दिसली की वाजतो, अशी माहिती त्याने दिली.
समोरून भरधाव ट्रक अन् युवक करतात व्यायाम !
नांदा येथील चेतन गाडगे, योगेश मुळे, चंद्रशेखर बावणे, हर्षल अंबोरे, दुर्गेश महावी, यश टेकाम हे युवक राष्ट्रीय महामार्ग गडचांदूर ते नांदा या राष्ट्रीय महामार्गावर सराव करत आहेत. या मार्गावरून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे शेकडो ट्रक धावतात, काही दिवसांपूर्वी अपघातही झाला होता. बिबी येथील रोशन हेपट, सोमेश्वर आत्राम आणि आवाळपूरचे प्रञ्चल मून, स्वराज मुंगुल, भारत दूतकूर, प्रणव ठाकरे, प्रज्वल मुसळे, प्रेम पाटील, कार्तिक कोंडेकर हे तरुण जीव धोक्यात घालून पोलिस होण्यासाठी सराव करीत आहेत.
"मैदान व धावण्यासाठी ट्रॅक नसल्याने आम्हाला नाइलाजास्तव नांदा-गडचांदूर या मार्गावर शारीरिक चाचणीची तयारी करावी लागते."
- चेतन गाडगे, नांदा
"क्रीडा संकुल व चांगले मैदान नाही. पावसाळ्यात सरावासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे काही युवक जिल्हास्थळी जातात. आम्ही गावात राहत असल्याने रस्त्यावर धावावे लागते."
- प्रज्वल मून, आवाळपूर