कचऱ्याच्या ढिगाला वारंवार आग लागते तरी कशी? नागरिकांना श्वास घेणे झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:53 IST2025-03-31T15:53:20+5:302025-03-31T15:53:49+5:30
Chandrapur : प्रदूषणामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या जिवाला धोका

How come the garbage dump keeps catching fire? It's becoming difficult for citizens to breathe
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खोडसाळपणा, दबावामुळे अथवा वैज्ञानिक कारणांमुळे उन्हाळ्यात बहुतांशवेळा जिल्ह्यातील कचरा डेपोला आग लागते. सामान्य नागरिकांना दुष्परिणामांच्या रूपात याची थेट झळ सोसावी लागते. परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दररोज ओला व सुका कचऱ्याचे संकलन केले जाते. हा कचरा डम्पिंग यार्डमध्ये संकलित केला जातो. गावाच्या वा शहराच्या बाहेर हे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी डम्पिंग यार्ड परिसरात आता वस्त्याही बघावयास मिळत आहेत. त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असतानाच उन्हाळ्याच्या दिवसात या डम्पिंग यार्डला आग लागण्याचा धोकाही त्यांना भेडसावत असतो. आगीचा धूर हा नागरिकांच्या नाकातोंडात जाऊन त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसवण्याचीही शक्यता असते.
कचऱ्याचा धूर जेवणाच्या ताटापर्यंत जिल्ह्याभरातील डम्पिंग यार्ड परिसरात अनेक वस्त्या विस्तारल्या आहेत. येथून निघणारा धूर अनेकांच्या घरात जात असल्याचे दिसून येते. वृद्धांना दमा चिमुकल्यांच्या नाकातोंडात धूर डम्पिंग यार्ड परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात असते. तर आग लागल्याने त्याचा धूर परिसरातील नागरिकांच्या नाकातोंडात जाऊन त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
कचऱ्यात मिथेन वायू; अचानक पेट घेतो
टाकाऊ कचऱ्यामध्ये मिथेन वायू असल्याने हा कचरा अचानक पेट घेतो. त्यामुळे आग लागलेल्या परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. कचऱ्यातून निघणारे धूर हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्यामुळे अशा परिसरात काम करताना तोंडाला व नाकाला मास्क लावणे गरजेचे आहे.
धूर, दुर्गंधी रोखण्यासाठी पालिका काय करतेय?
आरोग्य विभागामार्फत आग तसेच धूर विझविण्यासाठी अग्निशमन दलामार्फत पाण्याचा वापर केला जातो, कीटकनाशक औषध फवारणी केली जाते.
या वसाहतींत एक दिवस राहून दाखवा साहेब
कचरा डेपो परिसरात अनेक कॉलनी वसत्या आहेत, तेथील नागरिकांना धूर, दुर्गंधी, माश्यांचा खूप त्रास होत असतो. नागरिक त्याला कंटाळले आहेत. या वसाहतीत एक दिवस राहून दाखवा, असे आव्हानच अधिकाऱ्यांना दिले जाते.