भाजपच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा हरीश शर्मा व शहर अध्यक्षपदी राहुल पावडे यांची निवड
By राजेश भोजेकर | Updated: July 19, 2023 11:12 IST2023-07-19T11:10:40+5:302023-07-19T11:12:07+5:30
बल्लारपूर विधानसभा मतदारसंंघाला सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाचा मान

भाजपच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा हरीश शर्मा व शहर अध्यक्षपदी राहुल पावडे यांची निवड
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या २०२३ या वर्षाच्या कार्यकाळाकरीता नवीन जिल्हाध्यक्षाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर देवराव भोंगळे यांच्या जागेवर बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची नियुक्ती केली आहे. देवराव भोंगळे यांच्यापूर्वी हरीश शर्मा हेच जिल्हाध्यक्ष होते. विशेष म्हणजे बल्लारपूर विधानसभा मतदारसंंघाला सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.
जिल्हा शहर अध्यक्ष पदावर डॉ. मंगेश गुलवाडे हे होते. त्यांच्या जागेवर माजी उपमहापौर राहुल पावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नवनियुक्त पदाधिकारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक आहेत.