सेवानिवृत्तीनंतर तरी न्याय द्या, शिक्षकांचे १४ दिवसांपासून आंदोलन
By साईनाथ कुचनकार | Updated: February 19, 2024 16:10 IST2024-02-19T16:08:04+5:302024-02-19T16:10:56+5:30
शिक्षकांना न्याय केव्हा, उपस्थित केला प्रश्न.

सेवानिवृत्तीनंतर तरी न्याय द्या, शिक्षकांचे १४ दिवसांपासून आंदोलन
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : जिल्हा परिषदेमध्ये सेवा करून अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीचे सर्व लाभ तीन महिन्यांच्या आत देण्याचे शासन आदेश आहेत. मात्र, सेवानिवृत्त शिक्षकांना मागील अनेक महिन्यांपासून लाभ देण्यात आला नाही. परिणामी या सेवानिवृत्तांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तांचे आर्थिक लाभ त्वरित द्यावेत, या मागणीला घेऊन सेवानिवृत्त शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
१४ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २०१७-१८ पासूनची गटविमा प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. तरीसुद्धा त्यांच्या विधवांना लाभ मिळाला नाही. मागील सहा महिन्यांपासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ४० कोटी रक्कम थकबाकी आहे. ३० जूनला लागू होणारी वेतनवाढ प्रकरणे सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. आदी मागण्यांसाठी सेवानिवृत्त शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे.
या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, अजूनही दखल घेण्यात आली नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
१४ दिवसांपासून उपोषण :
सेवानिवृत्त शिक्षकांनी मागील १४ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन चौकशी केली. मात्र, अजूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने मागील १४ दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. विशेष प्रत्येक तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक आंदोलनात सहभाग घेत आहेत.