लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार १ लाख रुपये !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:15 IST2024-12-04T15:14:09+5:302024-12-04T15:15:56+5:30
लेक लाडकी योजना : ग्रामीण भागात सुरू आहे घरोघरी जनजागृती

Girls will get 1 lakh rupees under Lake Ladki Yojana!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, तीच्या शिक्षणास चालना मिळावी, बालविवाह थांबावे, मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करता, सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. याअंतर्गत अंगणवाडीसेविका घरोघरी जनजागृती करीत आहे. आता मुलगी झाल्यास पालकांवरील बोजा कमी करून तिला १८ वर्षे वयापर्यंत १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना 'लेक लाडकी' योजनेंतर्गत १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात शासनस्तरावरून प्रचार व प्रसार केला जात आहे. यासाठी अंगणवाडीसेविका परिश्रम घेत आहेत.
अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेची जनजागृती केली जात आहे. माहितीसाठी अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा.
अंगणवाडी सेविकेकडे करा अर्ज !
या अर्जात वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाइल नंबर, अपत्याची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. अर्ज भरून झाला की, अंगणवाडी सेविकेकडून पोहोचपावती घ्यायची आहे
असा मिळणार लाभ?
पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, १२वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
१ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
कोणती लागणार कागदपत्रे ?
जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेराक्स, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, दाखला, आदी कागदपत्रे लागणार आहेत.