१ फेब्रुवारीपासून मनपातर्फे ‘सुंदर माझी घरगुती बाग’ स्पर्धा
By परिमल डोहणे | Updated: January 29, 2024 17:45 IST2024-01-29T17:45:19+5:302024-01-29T17:45:29+5:30
मनपाच्या स्पर्धेतून सजणार घरगुती बाग

१ फेब्रुवारीपासून मनपातर्फे ‘सुंदर माझी घरगुती बाग’ स्पर्धा
चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत ‘शहर सुंदर व हरित करण्यासाठी माझे योगदान’ या थीमवर ‘सुंदर माझी घरगुती बाग’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात घरी छोटी बाग असणाऱ्या/ नवीन बाग तयार करू इच्छिणाऱ्या तसेच टेरेस गार्डन/ किचन गार्डन असणाऱ्या किंवा तयार करू इच्छिणाऱ्या स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे.
स्पर्धेत ‘टेरेस गार्डन/ किचन गार्डन’ व ‘माझी अंगणातील बाग’ असे दोन भाग असून, दोन्ही स्पर्धांना प्रत्येकी तीन रोख व १० प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. १८ तारखेपासून स्पर्धेत भाग घेण्यास नोंदणी सुरू झाली असून, नागरिकांना या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. यात ५०० स्क्वेअस फुटांपर्यंतच्या जागेत गार्डन किंवा बागेची निर्मिती करणाऱ्यांना छोट्या तर ५०० स्क्वेअर फुटांच्या जागेस मोठ्या गटात समाविष्ट केले जाणार आहे. शहरातील हरित प्रमाण (ग्रीन कव्हर) वाढावे व पर्यावरणपूरक वातावरणाच्या निर्मितीत नागरिकांचा हातभार लागावा या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
स्पर्धेच्या अशा आहेत अटी
जर भाडेकरू स्पर्धक असेल तर घरमालकाची नाहरकत परवानगी असावी, होम कम्पोस्टिंग कायमस्वरूपी असणे आवश्यक, स्पर्धेत कोणतेही साहित्य मनपाद्वारे पुरविण्यात येणार नाही, स्पर्धेत थर्मोकॉलचा वापर करणे टाळावे, सहभागी स्पर्धकांच्या संख्येनुसार बक्षीस रक्कम व रोख रक्कम कमी / जास्त करण्याचा अधिकार मनपाकडे राहील.