पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:26 IST2025-07-14T18:25:43+5:302025-07-14T18:26:26+5:30

अडीच हजार शेतकऱ्यांनीच भरला अर्ज : पीक कापणी प्रयोग आकडेवारीवरच भरपाई

Farmers turned their backs this year due to changes in the crop insurance scheme | पीक विमा योजनेत बदल केल्याने यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Farmers turned their backs this year due to changes in the crop insurance scheme

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
शासनाने मागील हंगामात लागू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत यंदा पूर्णतः बदल करण्यात आला. नवीन नियमावली जाचक असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी लाखोची संख्या होती. पण, यंदा आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार ५६६ हजार शेतकऱ्यांनीच विम्यासाठी नोंदणी केली. अंतिम तारीख आणि शेतकऱ्यांची नकारात्मक लक्षात घेता ही संख्या वाढेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


२०२३ च्या खरीप हंगामापासून राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येत होती. शेतकरी केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होऊ शकत होते. मात्र, आता राज्य सरकारनं ही योजना बंद केली आहे. आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के, रबी हंगामासाठी १.५ टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे.


एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारे भरपाई दिली जात होती. नवीन बदलांनुसार, यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत. आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. हे नियम जाचक ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.


कृषी विभागाचा सल्ला जेवढे पेरले तेवढेच नोंदवा

  • यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जेवढे पेरले तेवढीच नोंद पीक विम्याच्या अर्जात करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता यंदाच्या शासन निर्णयात काय बदल करण्यात आले, याची माहिती घेऊनच अर्ज भरण्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.
  • बोगस विमा उतरवल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पाच वर्ष काळ्या यादीत टाकून त्याला पाच वर्ष कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असेही २४ जून २०२५ च्या शासन निर्णयात नमूद आहे.


तालुकानिहाय पीक विमा भरणारे शेतकरी

  • बल्लारपूर - १३०
  • भद्रावती - २५८
  • ब्रह्मपुरी - ९४
  • चंद्रपूर - १३९
  • चिमूर - २५३
  • गोंडपिपरी - ४५३
  • कोरपना - १६६
  • मूल - ५७
  • नागभीड - ७२
  • पोंभूर्णा - १४४
  • राजुरा - २२६
  • सावली - ५२
  • सिंदेवाही - ३१
  • वरोरा - ४९१
  • एकूण - २५६६


ई-पीक पाहणी बंधनकारक
यासोबतच पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या पिकांची नोंद पीक पाहणी अंतर्गत करण्यात आली आहे त्याच पिकांसाठी विमा उतरवता येणार आहे.


३१ जुलैपर्यंत भरता येणार पीकविमा अर्ज
खरीप हंगाम २०२५ साठी ३१ जुलैपर्यंत पीकविमा अर्ज भरता येणार आहेत. यामध्ये शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा विमा भरू शकतात.

Web Title: Farmers turned their backs this year due to changes in the crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.