धान विक्री करून सहा महिन्यांनंतरही चुकाऱ्यापासून शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:50 IST2025-05-16T14:50:08+5:302025-05-16T14:50:56+5:30

Chandrapur : कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्री केलेल्या २७ शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही

Farmers deprived of compensation even six months after selling paddy | धान विक्री करून सहा महिन्यांनंतरही चुकाऱ्यापासून शेतकरी वंचित

Farmers deprived of compensation even six months after selling paddy

घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड :
शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या नागभीड येथील हमीभाव केंद्रावर धान विक्री केली. याला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही त्या शेतकऱ्यांना विक्री केलेल्या धानाचे चुकारे मिळालेच नसल्याचे समोर आले आहे. चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


शेकडो शेतकऱ्यांसोबत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धान पीक हातात आल्यानंतर शेतकऱ्यांनी धानाची विक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नागभीड तालुका खरेदी-विक्री संघ यांच्याकडे केली. इतर शेतकऱ्यांचे चुकारे आले. मात्र काही शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने हे शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांची चुकाऱ्यासाठी संबंधित धान खरेदी केंद्रांकडे सारखी मागणी सुरू आहे. केंद्रांचे कर्मचारी चंद्रपूर येथील वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा करीत आहेत. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून शासनाकडून चुकारे प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील, असेच उत्तर देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. आता हंगाम तोंडावर आला आहे. हंगामासाठी शेतकऱ्यांची पैशाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत हक्काचे पैसे मिळत नसतील तर काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 


येथे विकले होते शेतकऱ्यांनी धान
कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्री केलेल्या २७ शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे मिळाले नाहीत. नागभीड तालुका खरेदी-विक्री संघाकडे धान विक्री केलेल्या १५ शेतकऱ्यांचेही चुकारे बाकी आहेत. कोर्धा येथील पणन महासंघाच्या एका केंद्राकडे ६ शेतकऱ्यांचे चुकारे बाकी असल्याची माहिती आहे.


"सहा महिन्यांपूर्वीच धानाची विक्री केली. मात्र, अद्यापही धानाचे पैसे मिळाले नाहीत. लवकरच हंगाम सुरू होत आहे. अशा काळात शेतकऱ्यांना पैशाची खूप गरज असते. चुकारे लवकर मिळावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे."
- श्रीहरी आंबोरकर, शेतकरी नागभीड 


"कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धान विक्री केलेल्या २७ शेतकऱ्यांचे चुकारे बाकी आहेत. या चुकाऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाठपुरावा सुरू आहे."
- सप्तेश गुप्ता, सचिव कृऊबास. नागभीड.

Web Title: Farmers deprived of compensation even six months after selling paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.