बल्लारपूर शहरात नकली दारूचा कहर; प्रत्येक वॉर्डात सुरू अवैध विक्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:09 IST2025-07-04T17:08:15+5:302025-07-04T17:09:13+5:30
अहवालातून निष्पन्न : फरार मुख्य आरोपीला अटक करण्याचे आव्हान

Fake liquor rampage in Ballarpur city; Illegal sale starts in every ward!
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : शहरातून मंगळवारी (दि. १) पोलिसांनी जप्त केलेली १ लाख ५० हजार ५२० रुपयांची देशी-विदेशी दारू चक्क बनावट (नकली) असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालातून गुरुवारी (दि. ३) निष्पन्न झाले. या अहवालाने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून, फरार मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना झाली. बनावट दारू तयार करून विकणाऱ्या टोळीने आणखी कोणत्या शहरात जाळे तयार केले, याचाही तपास सुरू झाल्याची माहिती आहे.
बल्लारपूर शहरात काही महिन्यांपासून नकली दारू विकणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती. परंतु, पोलिस प्रशासनाच्या गुप्तचर विभागाने याकडे गांभीर्याने बघितले नाही. दरम्यान, १ जुलै २०२५ च्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी केली. त्यावेळी एमएच ३४ सीजे ६५७६ क्रमांकाची संशयास्पद स्कार्पिओ आढळून आली. या वाहनाची तपासणी करून देशी-विदेशी दारूसह २३ लाख ५० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहनातून गडचिरोली जिल्ह्यात दारू पुरवठा केला जात होता. कारवाई सुरू असताना याच वाहनाच्या मागे एमएच ३४ सीजे ७३३७ क्रमाकांचे वाहन सोडून एक जण फरार झाला. पहिल्या वाहनातून आरोपी नितीन राजन कुंडे (रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड) याला अटक झाली. मात्र, मुख्य आरोपी सिद्धार्थ ऊर्फ बापू भास्कर रंगारी (रा. रवींद्र प्रसाद) हा मोठ्या शिताफीने फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर आहेत.
एकाला अटक; दोन वाहनेही ताब्यात
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, ३१८ (४), ३३६ (२), ३४९ (२), ४९ गुन्हा दाखल करून नितीन कुंडे याला अटक केली. पोलिसांनी दारू विक्रेत्यांकडून दोन वाहने जप्त केली. संशयित आरोपींनाही ताब्यात घेणार असल्याचे समजते.
२३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेने १ लाख ३३ हजारांची देशी दारू, ९ हजार ३६० रुपयांची बिअर आणि ८ हजार १६० रुपयांची विदेशी दारू जप्त केली होती. एकूण २३ लाख ५० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दारू बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांनी पून्हा चौकशी सुरू केली.
बहुतांश वार्डात अवैध दारूविक्री
देशी, बिअर व विदेशी दारूचे नमुने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविले होते. या विभागाचा अहवाल बुधवारी (दि. ३) प्राप्त झाला. जप्त केलेली सर्व दारू बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे शहरातील अवैध अड्डयांवर दारू पिणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील बहुतांश वॉर्डात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय बेधडक सुरू आहे. ती दारू नकली नाही ना, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
"राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अहवाल प्राप्त झाला. जप्त केलेली सर्व दारू बनावट असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली होती. मुख्य सूत्रधार आरोपी सिद्धार्थ ऊर्फ बापू भास्कर रंगारी याच्या अटकेसाठी शोधशोध सुरू केली आहे."
- बिपीन इंगळे, ठाणेदार, बल्लारपूर