महसूल विभागाची परवानगी न घेता उत्खनन; कंत्राटदाराला तब्बल दीड कोटीचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:15 IST2025-01-20T16:13:34+5:302025-01-20T16:15:07+5:30
Chandrapur : डोंगरगाव परिसरात केले मुरमाचे अवैध उत्खनन

Excavation without permission from the Revenue Department; Contractor fined Rs. 1.5 crore
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचे काम सुरू आहे. यासाठी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात रेल्वे विभागाने महसूल विभागाची परवानगी न घेता मुरमाचे खोदकाम केले. यातील मुरमाचा रेल्वे लाइनच्या कामात वापर केला. महसूल विभागाने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर १ कोटी ५१ लाखांचा दंड आकारण्यात आला. मात्र कंत्राटदाराने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केली. या अपीलमध्येही दोषी आढळल्याने कंत्राटदारावर आणखी १० लाखाने दंड वाढविला आहे. आता कंत्राटदाराला एक कोटी ६१ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
डोंगरगाव रेल्वे परिसरात तिसऱ्या रेल्वे लाइनकरिता काम सुरू आहे. या कामासाठी डहाळा रिटमधील सर्वे नंबर २४ मधील जागा रेल्वेची असल्याचे कंत्राटदाराने भासवून अवैधरीत्या मुरमाचे खोदकाम केले. येथील मुरूम रेल्वेच्या कामात वापरला. यासंदर्भात डहाळा रिट परिसरातील ग्रामस्थ तसेच छोटु शेख यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर तहसीलदारांसह अन्य कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. यामध्ये परवानगी न घेता उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडील अपील पडली दहा लाखांत
तहसील प्रशासनाने रेल्वेच्या कंत्राटदाराला एक कोटी ५१ लाख रुपयांचा दंड आकारला होता. या आदेशाविरुद्ध रेल्वेच्या कंत्राटदाराने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केली. मुरूम उत्खनन करताना शासनाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे नमूद करीत तहसीलदार योगेश कौरटकर यांनी आकारलेला दंड योग्य असून हा आदेश कायम ठेवत उपविभागीय अधिकारी डी जेनीत चंद्रा यांनी यामध्ये दहा लाखांची दंडाची वाढ करीत एक कोटी ६१ लाख रुपयांचा दंड आकारला.
वाढीव दंड
तहसील प्रशासनाने प्रथम एक कोटी ५१ लाख रुपयांचा दंड आकारला होता. यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर दंडाची रक्कम आणखी वाढली. यामुळे आता कंत्राटदाराला वाढीव दंड भरावा लागणार आहे. याबाबत चर्चाना उत आला आहे.
३ वाहने ट्रॅक्टर, जेसीबी मशीन जप्त
मुरमाचे अवैध खोदकाम केल्याप्रकरणी तीन ट्रॅक्टर व जेसीबी पोलिस प्रशासनाने जप्त केली आहे. या प्रकरणी महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. कंत्राटदाराने अपील केल्यानंतर दंड वाढविण्यात आला आहे.