खेळण्या-बागडण्याच्या वयातच लहान मुलांना का लागत आहेत चष्मे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:11 IST2024-12-14T15:09:24+5:302024-12-14T15:11:37+5:30
बदलती जीवनशैली : स्क्रिन टाईममुळे चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले

Even at the age of playing and gardening, young children cannot see far!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बदलती जीवनशैली, सतत मोबाइल, लॅपटॉपचा वापर, तासनतास टीव्ही पाहणे आदी कारणांमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक लहान मुलांना तर लांबचे दिसण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळीच मुलांना मोबाइल, लॅपटापपासून दूर ठेवण्याचा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गुंजन इंगळे, कांबळे यांनी दिला आहे.
मोबाईल आजकाल सर्वांची गरजच झाली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे तर मोबाईलचा वापर अति प्रमाणपात वाढला आहे. यासोबतच लहानपणापासूनच गरजेपेक्षा जास्त टीव्ही पाहणे, मोबाइल बघणे, एकटक स्क्रिन पाहत राहणे, डोळे चोळणे, खाण्यापिण्यात पोषक तत्त्वांचा अभाव यामुळे कमी वयातच चष्मा लागत असल्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु वेळीच तपासणी न झाल्यास मुलांना दृष्टिदोष येण्याचा धोका असतो. मुलांना हा धोका टाळण्यासाठी आपल्या मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला लावावे, शक्यतो मुले मोबाइलपासून दूर राहतील या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दोषांची कारणे आणि पालक
एक-दोन वर्षाचे लहान बाळ मोबाइल किती छान चालवितो म्हणून आपण त्याचे कौतुक करतो, पुन्हा तो रडताना, जेवताना हातात मोबाइल देऊन बाजूला होतो. याच सवयीमुळे पुढे जाऊन त्याच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि चष्मा लागतो. २ आजघडीला मुले मैदानी खेळ सोडून कार्टून, अॅनिमेटेड व्हिडीओ पाहतात. मोबाइल गेमिंग, अभ्यास किंवा मनोरंजनासाठी स्मार्ट फोन किंवा इतर स्मार्ट स्क्रिन समोर जास्त वेळ घालवतात. त्यांच्यापासून डोळ्यांचे अनेक प्रकारे नुकसान करतात. परिणामी मुलांमध्ये चष्याचे प्रमाण वाढत आहे.
काय काळजी घ्याल?
- मोबाइल-टीव्ही वापर कमी करा.
- किमान १ तास मैदानी खेळ खेळा.
- टीव्ही पाहताना कमीत कमी दहा फुटांचे अंतर ठेवणे
- नाश्ता आणि आहारात दूध, फळे, जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश करणे
"लहान मुलांनाही डोळ्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना विशिष्ट वेळच मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप बघू द्यावा, मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य द्यावे. मुलांचे डोळे लाल झाले किवा त्यांच्या डोळ्यातून पाणी गळले तरीही बरेचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता वेळीच नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."
- डॉ. गुंजन इंगळे, कांबळे, नेत्ररोगतज्ज्ञ, चंद्रपूर