हत्तीरोग औषध वितरण मोहीम थांबवली ! वितरण करताना तुटू लागल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:41 IST2025-02-15T14:40:52+5:302025-02-15T14:41:57+5:30
Chandrapur : जिल्ह्यातील हत्तीरोग औषधोपचार मोहीम, गोळ्या दिल्लीला पाठवल्या

Elephantiasis medicine distribution campaign stopped! Pills started breaking during distribution
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातून सर्वाधिक हत्तीरोगाचे ९ हजार ३२१ रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्याने आरोग्य विभागाने सोमवारपासून (दि. १०) प्रतिबंधात्मक गोळी वितरण मोहीम सुरू केली होती. मात्र, स्ट्रीपमधून बाहेर काढताना गोळ्या तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ही मोहीम तडकाफडकी थांबवून राज्य शासनाला कळविले. राज्याकडून दिल्लीला अहवाल गेल्याने २९ लाख ९७ हजार गोळ्या रिप्लेस करून देण्याचा संयुक्त निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यातून सर्वाधिक रुग्णसंख्या चंद्रपूर जिल्ह्यात असल्याने हा जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून घोषित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, हत्तीरोग दुरीकरणासाठी सोमवारपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू करण्यात आली. २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ११ लाख ९४ हजार ३५७पात्र नागरिकांना गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन होते. चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व विमूर या १० तालुक्यांत रुग्णसंख्या अधिक असल्याने विशेष फोकस ठेवला. आरोग्य पथक घरोघरी भेट देऊन नागरिकांना गोळ्या खाऊ घालत होते. दरम्यान, स्ट्रीपमधून गोळी काढली की तुटत असल्याचे दिसून आले. पथकाने ही बाब जिल्हा हत्तीरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी राज्य शासन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांना माहिती दिली. त्यानंतर मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, नवीन गोळ्या येईपर्यंत मोहीम तत्काळ थांबविण्यात आली आहे.
नवीन गोळ्या आल्यानंतर सुरू होणार मोहीम
नवीन गोळ्या आल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा मोहीम सुरू होईल. जिल्ह्यातील १०३० गावांत व २२ वॉर्डातील १२ लाख ५४ हजार ५१० पैकी ११ लाख २४ हजार ३५७ पात्र व्यक्तींना गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले.
११ लाख ९४ हजार ३५७ नागरिकांना गोळ्या खाऊ घालणार
मोहिमेसाठी २१ व २२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्येक गावांत एक बूथ याप्रमाणे एकूण १ हजार २५३ बूथ निश्चित केले. २ हजार २२० आरोग्य कर्मचारी, ३१५ पर्यवेक्षकांची नियुक्ती झाली
गोळ्यांतील 'कटेंट ओके'
केंद्र सरकारच्या अधिनस्थ यंत्रणेकडून जिल्ह्यासाठी २९ लाख ९७ हजार प्रतिबंधात्मक गोळ्या पाठविल्या होत्या. गोळ्यांचे उत्पादन नियम व नामांकनानुसार 'कटेंट ओके' आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. गोळ्या स्ट्रीपमधून बाहेर काढताना तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने मुंबईला कळविले. मुंबईने ही बाब दिल्लीच्या लक्षात आणून दिली.
"जिल्ह्याला प्राप्त झालेल्या गोळ्यांबाबत जी समस्या निर्माण झाली, ती माहिती शासनाला कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसारच मोहीम थांबविण्यात आली."
- डॉ. प्रकाश साठे, हत्तीरोग प्रतिबंधक अधिकारी, चंद्रपूर
"गोळ्यांमधील कटेंटबाबत शंका नाही. मात्र, वितरण करताना गोळ्या तुटण्याच्या घटना घडल्याने मोहीम थांबवली. सर्व गोळ्या रिप्लेस करून मिळणार आहेत. गोळ्या आल्यानंतर, सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पुन्हा सुरू केली जाईल."
- डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य, अधिकारी, चंद्रपूर
अशी आहे रुग्णसंख्या
ब्रह्मपुरी १५९७
नागभीड १०७१
सावली १०३४
चिमूर ९६७
सिंदेवाही ७७९
वरोरा ५७३
भद्रावती ५५१
मूल ४८७
गोंडपिपरी ४२३
चंद्रपूर ३४९
राजुरा ३२९
पोंभुर्णा ३०८
बल्लारपूर २३३
कोरपना २१८
जिवती १८
मनपा क्षेत्र ३८४
एकूण ९३२१