जिल्हा बँकेने बाउन्सर लावून घेतल्या मुलाखती; भरती प्रक्रियेत १०० कोटींची उलाढाल झाल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:29 IST2025-01-14T14:28:30+5:302025-01-14T14:29:57+5:30
नोकरभरती प्रकरण : बँकेसमोर उपोषण सुरूच

District bank conducts interviews with bouncers; Complaint of turnover of Rs 100 crore in recruitment process
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपाई पदाच्या मुलाखती सोमवारी (दि. १३) तगडा पोलिस बंदोबस्त व खासगी बाउन्सर लावून घेण्यात आल्या. बँकेतील विविध ३५८ पदांच्या भरती प्रक्रियेत १०० कोटींची आर्थिक उलाढाल झाल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनोज पोतराजे यांनी केली. एका संघटनेचे बँकेसमोरच सध्या उपोषण सुरू आहे. त्यामुळे हे बाउन्सर प्रकरण बेरोजगार उमेदवारांसह सहकार क्षेत्रातही चर्चेचा विषय ठरला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक २६१ आणि शिपाई ९७ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा २१, २२,२३ आणि २९ डिसेंबर रोजी झाली. शिपाई पदांच्या मुलाखती १३, १४ आणि १५ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर लिपिक पदांच्या १६ ते २३ जानेवारी २०२५ रोजी आहेत. सोमवारी बँकेच्या सभागृहात शिपाई पदाच्या मुलाखती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, उपाध्यक्ष व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी चौघांनी घेतल्या. मुलाखती दरम्यान पोलिस बंदोबस्तासोबतच जिल्हा बँकेसमोर खासगी बाउन्सर लावण्यात आल्याचे दिसून आले. मुलाखत स्थळी ये-जा करण्यास सर्वांना मज्जाव करण्यात आला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला मात्र स्वीच ऑफ आढळून आला.
यापूर्वी पुढे ढकलली होती परीक्षा
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी २१ जानेवारीला राज्यातील काही मोजक्या केंद्रावर तांत्रिक बिघाड झाला आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या; मात्र हा तांत्रिक बिघाड नव्हता. काही हॅकर्सनी स्क्रीन हॅक करण्याचा प्रयत्ल केला. हा प्रकार काही संचालकांच्या लक्षात येताच तातडीने परीक्षा पुढे ढकलल्या.