पोंभुर्णा तालुक्यात वाघिणीचा मृत्यू; आठ दिवसांत ३ बछडे व वाघीणीच्या मृत्यूने वन खाते हादरले
By राजेश भोजेकर | Updated: September 12, 2023 15:53 IST2023-09-12T15:51:21+5:302023-09-12T15:53:25+5:30
वाघिणीचा मृत्यूचे कारण अस्पष्ट

पोंभुर्णा तालुक्यात वाघिणीचा मृत्यू; आठ दिवसांत ३ बछडे व वाघीणीच्या मृत्यूने वन खाते हादरले
चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील वाघिणीपासून दुरावल्याने तिच्या तीन पिल्लांचा उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी सकाळी पोंभुर्णा तालुक्यांअंतर्गत येणाऱ्या फिस्कुटी गावातील शेतात अडीच वर्षाची वाघीण मृतावस्थेत मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील फीस्कुटी येथील पपलु वामन शेंडे हे चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या जगदिश गावतुरे यांची शेती करतात. मंगळवारी सकाळी ७:३० वाजताचे सुमारास एक मजूर महीला नींदन करण्यासाठी त्याचे शेतात गेली असता त्यांना तिथे एक वाघ मृतावस्थेत आढळला. त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फीस्कुटीचे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली.
माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता दोन ते अडीच वर्षाची वाघीण मृतावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. ही घटना कक्ष क्रमांक २९१ मधील आहे. दरम्यान या वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे रहस्य गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे ३१ जुलै रोजी भद्रावती तालुक्यातील एका गावात जिवंत वीज पुरवठा सोडून वाघाची शिकार करण्यात आली होती. त्या प्रकरणी एका शेतमालक आरोपीला वन खात्याने अटक केली आहे. सदर प्रकरण ताजे असताना पुन्हा तसाच प्रकार तर घडला नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.