ऑनलाइन जन्म दाखल्याकरिता होतेय नागरिकांची पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:58 IST2025-06-19T16:57:20+5:302025-06-19T16:58:52+5:30
कसे होणार ? : आधार अपडेटअभावी नागरिकांचे कामे खोळंबली

Citizens are flocking to get birth certificates online
शशिकांत गणवीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : प्रत्येक भारतीयाला आधार कार्डच्या माध्यमातून 'अद्वितीय ओळख' क्रमांक देण्यात आला आहे. ज्याला आधार क्रमांक असे म्हणतात. परंतु, आधार कार्डवर बऱ्याच नागरिकांच्या जन्मतारखेत घोळ आहे. जन्मदाखला व आधार कार्ड यामध्ये असणाऱ्या जन्मतारखा भिन्न असल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, विदेशवारी करणाऱ्यांना कागदपत्रांसाठी अडचण निर्माण होत आहे.
पूर्वी हस्तलिखित जन्मदाखला काढून आधारवरील चुकीच्या जन्मतारखेत दुरुस्ती करता यायची; परंतु, आता युआयडीआयने ऑनलाइन जन्मदाखला असल्याशिवाय आधार दुरुस्ती होणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालकांना आपल्या पाल्याच्या जन्मठिकाणी ऑनलाइन जन्म दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
टोल-फ्री क्रमांक, समाधानकारक उत्तर नाही
डिजिटल जन्मदाखला असेल, तरच आधार दुरुस्ती करणे शक्य होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा प्रयत्न करूनही आधारकार्ड अपडेट होत नसल्याने नागरिकांची शासकीय कार्यालयीन कामे अडगळीत पडली आहेत. लाडकी बहीण योजनेपासून युआयडीमध्ये बिघाड निर्माण झाला. कुठलीही शहानिशा न करता आधार केंद्रावरून जन्मदाखले अपलोड केले. विशेष म्हणजे, केंद्र शासनाचा हा युआयडीआय उपक्रम उत्तर प्रदेशमधील एका खासगी कंपनीकडून संचालित होतो. १९४७ हा टोल-फ्री क्रमांक आहे. परंतु, समाधानकारक उत्तर मिळत नाही.
जन्मदाखल्यासाठी आठवडाभर मुक्काम
निव्वळ जन्म दाखल्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कोसोदूर असलेल्या शहरात आठवडाभर तळ ठोकून बसावे लागत असेल, तर त्याने जन्म दाखल्यापासून वंचित राहावे काय किंवा त्यांच्या पाल्यांनी पुढील शिक्षणाची वाट अधांतरीच सोडून द्यावी का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. तेव्हा शासनाने जन्मस्थळ कुठलेही असो, ती व्यक्ती ज्या तालुक्यातील रहिवासी असेल, त्या तालुका प्रशासनाकडे अशा जन्माच्या नोंदी हस्तांतरीत कराव्यात, अशी मागणी ऑनलाइन दाखल्यासाठी त्रस्त झालेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ऑनलाईन दाखला नसेल तर दुरुस्ती नाही
आता युआयडीआयने ऑनलाइन जन्मदाखला असल्याशिवाय आधार दुरुस्ती होणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालकांना आपल्या पाल्याच्या जन्मठिकाणी ऑनलाइन जन्म दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
"आधार कार्डवर असलेल्या चुकीच्या जन्मतारखेच्या दुरुस्तीसाठी जन्मदाखल्याचा पुरावा घेऊन दररोज नागरिक येतात. परंतु, दाखला ऑनलाइन काढलेला असेल, तरच युआयडी पोर्टलवर अपलोड करता येतो. हस्तलिखित दाखला अपलोड होत नाही."
- प्रमोद माशाखेत्री, संचालक, आधार केंद्र, मूल