महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर विदर्भाच्या मिरचीतोड मजुरांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:48 IST2025-01-13T12:40:06+5:302025-01-13T12:48:04+5:30

हाताला काम नाही : कुटुंबासह मजूर निघाले तेलंगणाकडे

Chilli harvesting workers from Vidarbha looted on Maharashtra-Telangana border | महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर विदर्भाच्या मिरचीतोड मजुरांची लूट

Chilli harvesting workers from Vidarbha looted on Maharashtra-Telangana border

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंडपिपरी :
गोंडपिपरी तालुक्यात वर्धा, अंधारी, वैनगंगा या मोठ्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. तालुक्यातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धान कापणीनंतर आता कापूस वेचणी झाली. तालुक्यात उद्योग नसल्याने तरुणांच्या हाताला काम नाही. पोट भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह, गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे जातात. गोंडपिपरी तालुक्यातील बहुतांश गावातील प्रत्येक गावातून किमान ५० मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा आंध प्रदेशकडे रवाना झाले आहेत. अशातच महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील पोडसा येथील पुलावर विदर्भाच्या मजुरांचे हाल होत आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात तेलंगणाच्या ऑटोचालकांकडून लूट केली जात असल्याचा संतापजनक प्रकार पोडसा येथे सुरू आहे.


गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांचे केवळ शेतीवरच जीवनमान अवलंबून आहे. तालुक्यात तीन बारमाही नद्या वाहात असताना बळीराजा अजूनही शाश्वत शेतीपासून दूर आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या सोनापूर टोमटा, किरमिरी दरुर दोनही सिंचन योजना रखडलेल्या आहेत. योजनेचे पाणी कधी मिळणार हा प्रश्न बळीराजा विचारत आहे. 


तालुक्यात सिंचनाची व्यवस्था नाही. शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या. मात्र, शेकडो शेतकऱ्याची वीज कनेक्शनअभावी शेती संकटात आहे. शासनाने वीज कनेक्शन देणे बंद केले असून, सोलरसाठी पावले उचलली जात आहेत. मात्र, सोलर कंपनी सव्र्हिस व्यवस्थित नसल्याने ज्यांनी सोलर लावले अशा अनेक शेतकऱ्यांचे सोलर बिघडलेल्या अवस्थेत असून, तेही शेतकरी संकटात आहेत. अशातच शेती हंगाम झाला. आता हाताला काम नसल्याने पोट भरण्यासाठी तालुक्यातील गावा गावातील मजुरांचे लोंढे मिरची तोडण्यासाठी वरंगल, हैदराबाद, खमंग, ढोरनक्कल अशा ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यात जात आहे. 


तेलंगणा - महाराष्ट्र सीमा ही लागून असून, पोडसा या गोंडपिपरी तालुक्याच्या शेवटच्या गावापासून केवळ पंधरा किलोमीटर अंतरावर तेलंगणा येथील शिरपूर रेल्वे स्टेशन आहे. तिथे जाण्यासाठी मजूर खासगी वाहनाने जातात. मात्र, त्यांची वाट सीमेलगत असलेल्या पोडसा गावात तेलंगणातील ऑटोचालकांकडून अडवली जात आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनांवर तेलंगणात कारवाई केली जात असून, सीमेवरच आता ऑटोचालक त्यांची वाट अडवत आहेत.


महाराष्ट्रातील मजुरांचे वाहन अडवून करतात चालान 
अशावेळी तेलंगणात महाराष्ट्रातील खासगी वाहनांवर तेथील पोलिस व ऑटोचालक यांचे संगनमत असल्याने ऑटो चालकांकडून माहिती पुरवून त्या वाहनावर मोठी कारवाई केली जाते. आर्थिक दंड वसूल केला जात असल्याने महाराष्ट्रातील खासगी वाहनचालक तेलंगणात वाहन टाकायला घाबरतात. मात्र, तेलंगणातील शेकडो टी. एस. नंबर प्लेट असलेले वाहन खुलेआम अनधिकृतपणे मजुरांची वाहतूक महाराष्ट्रातून तेलंगणात करतात. अशावेळी महाराष्ट्रातील सीमेलगत असणारे पोलिस गप्प बसलेले आहेत. तेलंगणा येथील ऑटो चालकांकडून पोडसा पुलावर वाहन अडवून मजुरांकडून तिकिटाचे अवाढव्य पैसे वसूल करत असल्याने गोंडपिंपरी तालुक्यासह विदर्भातील मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या मजुरांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

Web Title: Chilli harvesting workers from Vidarbha looted on Maharashtra-Telangana border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.