Chandrapur Lok Sabha Results 2024 : प्रतिभा धानोरकर पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परीक्षा पास; आधी आमदार आणि आता खासदारकीकडे वाटचाल
By साईनाथ कुचनकार | Updated: June 4, 2024 16:38 IST2024-06-04T16:22:51+5:302024-06-04T16:38:05+5:30
Chandrapur Lok Sabha Results 2024 : पतीच्या निधनानंतर न डगमगता कार्य सुरूच ठेवले

Pratibha Dhanorkar First MLA and now is nerar to become MP
साईनाथ कुचनकार/ चंद्रपूर
Chandrapur Lok Sabha Results 2024 : दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी प्रतिभा धानोरकर यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच वरोरा विधानसभा निवडणूक लढविली आणि त्या निवडून आल्या. त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पतीच्या निधनानंतर न डगमगता आपले कार्य सुरूच ठेवले. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविली.
प्रतिभा धानोरकर यांचा जन्म ९ जानेवारी १९८६ रोजी वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत विवाह झाला. सासरी राजकीय वातावरण असल्याने प्रतिभा धानोरकर यांना सामाजिक तसेच राजकीय बाळकडू येथेच मिळाले. प्रथम सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्यातही भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली. पती बाळू धानोरकर हे शिवसेनेकडून आमदार झाले. त्यावेळी त्यांनी सक्रिय प्रचारात सहभाग घेतला. त्यानंतर २०१९ मध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि वरोरा विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार झाल्या. त्यानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायदा व्हावा यासाठी नागपूर अधिवेशनात त्यांनी प्रथम मागणी केली. तृतीयपंथींना आरक्षणासाठीही त्यांनी मागणी केली.
पतीच्या निधनानंतर लोकसभा क्षेत्रात सक्रीय
पतीच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्राकडे लक्ष देणे सुरू केले. त्यांनी आर्णीपासून तर जिवतीपर्यंत क्षेत्र पिंजून काढले. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची काँग्रेसने उमेदवारी दिली.
संघर्ष जितका मोठा तितका विजय मोठा
प्रचाराच्या दरम्यान मी सातत्याने स्टेटस ठेवले होते की संघर्ष जेवठा मोठा राहील तेवढाच विजय शानदार राहील. त्यामुळे ऐतिहासिक विजय हा चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रात झाला आहे. हा माझा विजय नसून जनतेचा, सामान्यांचा, शेतकऱ्यांचा विजय आहे. भाजप सरकारला जनता कंटाळली होती. जनतेला परिवर्तन पाहिजे होते. त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली.