चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीची सुनावणी पूर्ण, निकाल राखून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:19 IST2025-06-25T13:10:36+5:302025-06-25T13:19:53+5:30
अंतिम निकालाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष : १० जुलैला होणार संचालकपदांसाठी मतदान

Chandrapur District Bank election hearing complete, results reserved
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीदरम्यान नामांकन अर्जासोबत जोडलेल्या अंकेक्षण अहवालासंदर्भातील वाद उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. सोमवारी (दि. २३) या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून, न्या. पानसरे यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे. येत्या तीन दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. दरम्यान, एका विद्यमान संचालकाने निवडणुकीतून माघार घेतली आहे.
चंद्रपूर जिल्हा बँकेसाठी १० जुलैला मतदान तर ११ जुलै २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. २७जून २०२५ पर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. नामांकन अर्जासोबत काही उमेदवारांनी वित्तीय वर्ष २०२४-२५ या वर्षातील अ आणि ब वर्गातील अंकेक्षण अहवाल जोडले होते. या अहवालांवर आक्षेप घेत काही याचिकाकर्त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व अॅड. सुनील मनोहर यांनी, तर प्रतिवादींचे प्रतिनिधित्व अॅड. एम. डी. बांगडे यांनी केले.
दरम्यान, आणखी एका प्रकरणात पोंभुर्णा तालुक्यातील उमाराणी मरपल्लीवार, गोंडपिपरीचे अमर बोडलावार, तसेच कोरपण्याचे तुकाराम पवार यांनी नामांकन अर्जासोबत वैनगंगा खोरे वाहतूक संस्थेचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेत न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरही पुढील तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत पाच संचालक अविरोध
जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक गजानन पाथोडे यांनी नागभीड तालुक्यातील अ गटातून माघार घेतली. त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश तर्वेकर यांचा अविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. पाथोडे आता ओबीसी गटातून रिंगणात आहेत. तर्वेकर हे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यापूर्वी पाच संचालक अविरोध निवडून आले.