चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा; नोकरभरती काँग्रेसला भोवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:05 IST2025-07-23T14:03:31+5:302025-07-23T14:05:05+5:30

Chandrapur : अध्यक्षपदी रवींद्र शिंदे, तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची बिनविरोध निवड

BJP flag on Chandrapur District Bank; Recruitment becomes hurdle for Congress | चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा; नोकरभरती काँग्रेसला भोवली

BJP flag on Chandrapur District Bank; Recruitment becomes hurdle for Congress

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने पहिल्यांदाच बँकेवर झेंडा फडकावला आहे. मंगळवारी (दि. २२) जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या संचालकांच्या सभेत भाजपच्या गोटातील संचालक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी, तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. काँग्रेसचे खासदार व नवनिर्वाचित संचालक प्रतिभा धानोरकर यांनी या निवड सभेला गैरहजर राहणे पसंत केले.


भाजपने चिमूरचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांना चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची साथ लाभली. हा विजय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार भांगडियांकडून वाढदिवसाचे 'स्पेशल गिफ्ट' असल्याचे बोलले जात आहे. सकाळी ११ वाजता सहलीवरून परतलेल्या संचालकांनी बँकेच्या सभागृहात प्रवेश केल्यानंतर अध्यक्षपदासाठी रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी संजय डोंगरे यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून कोणतेही नामांकन न आल्याने ही निवड अविरोध झाली. आमदार भांगडिया आणि जोरगेवार यांनी शिंदे यांना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवून पदाची सूत्रे सोपविली. काँग्रेसकडे १२ संचालक असूनही त्यातील काहीजण भाजपशी जवळीक साधल्याने त्यांचा खेळ बिघडला. दुसरीकडे, आ. भांगडिया यांचे राजकीय डावपेच भाजपसाठी उपयोगी ठरले. विशेष म्हणजे, अध्यक्ष रवींद्र शिंदे हे सुरुवातीला काँग्रेस गोटात होते. मात्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसकडे असलेले संचालकच फितूर निघाल्याने काँग्रेसचा खेळ खल्लास झाल्याची चर्चा आहे.


नोकरभरती काँग्रेसला भोवली
निवडणुकीपूर्वी संतोषसिंह रावत यांच्या कार्यकाळात बँकेत ३५८ जागांसाठी नोकरभरती घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. बँकेची निवडणूक झाल्यानंतर भरतीप्रकरणी काँग्रेस गोटातील काही नवनिर्वाचित संचालकांना ईडीची नोटीस गेल्याची चर्चा आहे. आता कारागृहाची हवा खावी लागेल, या भीतीने संचालकांनी नांगी टाकल्याची चर्चा आहे.


बंटी भांगडिया खरे 'किंगमेकर'
आमदार बंटी भांगडिया यांनी जिल्हा बँकेची निवडणूक मनावर घेतली होती. पहिल्या दिवसापासून त्यांनी बांधलेली मोट अध्यक्षनिवडीपर्यंत कायम होती. भांगडिया यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीत 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडली. सर्व संचालकांना सोबत घेऊन बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधणार असल्याची प्रतिक्रिया आमदार भांगडिया यांनी दिली.

Web Title: BJP flag on Chandrapur District Bank; Recruitment becomes hurdle for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.