बांबू हस्तकला वस्तूला मिळणार आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 14:58 IST2024-12-14T14:55:24+5:302024-12-14T14:58:11+5:30
उद्योजकांची कार्यशाळा : विविध जिल्ह्यांतून सहभागी झाले कारागीर

Bamboo handicrafts will now get an international market.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महानिर्देशक विदेश व्यापार कार्यालय नागपूर (डी. जी. एफ. टी.) व हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद यांच्या वतीने विदर्भातील बांबू उद्योजक, बांबू कारागीर समूह यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन वन अकादमी येथे करण्यात आले होते. विदर्भातील बांबू हस्तकलेला जागतिक बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांतून बांबू उद्योजक व कारागीर सहभागी झाले होते. उद्घाटन नागपूर डी. जी. . एफ. टी. च्या सहायक निदेशक स्नेहल ढोके यांनी केले. यावेळी वनप्रबोधिनीच्या अपर संचालक मनीषा भिंगे, मुख्य डाक कार्यालयाचे विकास अधिकारी सुधीर आकोटकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक सागर खापणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी काठोळे, पंधरे, बी. आर. टी. सी. चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
शासन योजनांचा लाभ घ्यावा
आंतरराष्ट्रीय व्यापारात विदर्भातील बांबू वस्तूची विक्री ही मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा बांबू उद्योजक व कारागीर यांनी घेतला पाहिजे, असे आवाहन, वनप्रबोधिनीच्या अपर संचालक मनीषा भिंगे यांनी केले.
योजनांची माहिती
जगातील हस्तकला वस्तूच्या व्यापारात भारताचा ४० टक्के वाटा असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांबू हस्तकला वस्तूची बरीच मागणी आहे. विदर्भातील या बांबू वस्तूची निर्यात वाढविण्यासाठी डी. जी. एफ. टी. कार्यालयातर्फे विशेष प्रयत्न केले जात असून कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी सहायक निदेशक स्नेहल ढोके यांनी दिली.