बल्लारपूर-चंद्रपूर जंगल मार्ग देतोय सफारीचा आनंद !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:56 IST2024-07-29T16:54:27+5:302024-07-29T16:56:13+5:30
Chandrapur : निसर्ग अनुभवण्यासाठी जा लॉन्ग ड्राईव्हला

Ballarpur-Chandrapur forest route gives the joy of safari!
बल्लारपूरः रोडच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी, लहान-मोठी आणि विविध प्रकारची वृक्षरांझी, मध्येच लाल पिवळ्या व अन्य रंगांचे वनफुलांनी बहरलेले झाड, तर कुठे वनरांझी या वृक्षवेलीचे गडद झुडुप, त्यात ससा वा खारूताई वगैरे प्राण्यांचा अधीवास, पक्षांची किलबिल! तर रोडच्या दोन्ही बाजूने नुकतेच लावण्यात आलेले कडू निंबाचे चिमुकले वृक्ष व त्यावरील छानशी दिसणारी चमकदार पाने.
अशी ही गर्द वनसृष्टी चंद्रपूर- बल्लारपूर या जंगल मार्गी चौपदरी रोडच्या दोन्ही बाजूंनी सध्या सजली असून आपल्या हिरव्या आकर्षक श्रृंगाराने ती या रोडने जाण्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे. या हिरवाईसोबतच सुमारे १५ किलोमीटर लांबीच्या या रोडचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्यावरील उंच सखल आणि लहान मोठी सुमारे १५ सुलभ वळणं! ही वळणं वाहनचालकांना आनंद देतात. या रोडवर वनश्रीच्या आनंदासोबतच मार्गावरील नव्याने उभे झालेले बॉटनिकल गार्डन, भव्य परिसरातील देखणी सैनिक शाळा, या लक्ष वेधून घेतात. तर, पॉवर हाऊसजवळील उंच सखल वळणदार रस्ता घाट रोडचा अनुभव करून देतो. हा मार्ग पूर्वी दुपदरी होता तेव्हा, या मार्गाने जाणारे बस आदी वाहने झाडांच्या एवढे जवळून जात की प्रसंगी झाडांची पाने खिडकीतून बसच्या आत शिरून प्रवाशांशी मुके हितगुज करत. चौपदरी रोड झाल्यानंतर आता झाडे झुडपं बरे दूर झालेले आहेत. या रोडवरील हिरवी श्रीमंती नेहमीच आपल्याकडे खुणावत असते. पावसाळ्यात मात्र अधिक ! एक तर हिरवाकंचपणा, त्यावर हलक्या पाऊस धारा आणि पानापानांवर टाकणारे इवले इवलेसे थेंबा खूप वर्षांपूर्वी हे जंगल खूपच दाट होते.