मदतनिसाच्या ३१ जागांसाठी उच्च पदवी धारकांकडून तब्बल ५१६ अर्ज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:36 IST2025-04-26T16:34:59+5:302025-04-26T16:36:25+5:30
Chandrapur : पात्रता बारावीची; अर्ज मात्र उच्च पदवी धारक महिलांचे

As many as 516 applications from higher degree holders for 31 assistant posts!
राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मागील काही वर्षात बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यात महिला बेरोजगारांची संख्याही अधिक आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चिमूर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत मदतनिसाच्या ३१ जागांसाठी तब्बल ५१६ बेरोजगार महिलांनी नामांकन दाखल केले आहे. यामध्ये आता कोणाचा नंबर लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तीन ते पाच वर्षाच्या मुलांना अंगणवाडी केंद्रात दाखल करून शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडी केंद्रातून केले जाते. या केंद्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस अशी दोन पदे शासनाकडून भरण्यात येतात. अंगणवाडीताई व मदतनीस चिमुकल्यांना विविध धडे देतात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र शासन पुरस्कृत योजनेसाठी नागरी क्षेत्रातील चिमूर प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती केली जाणार आहे. सिंदेवाही, नागभीड, चिमूर, भद्रावती, ब्रह्मपुरी तालुक्यांतील अंगणवाडीत मदतनिसाच्या ३१ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी बारावीची पात्रता आहे. मात्र भरतीसाठी बी.ए., एम.ए. बी. एड., एम. एस्सी. झालेल्या महिलांनी अर्ज केले आहेत.
मदतनिसाच्या रिक्त जागा
चिमूर १२, भद्रावती०५, सिंदेवाही०४, नागभीड०७, ब्रह्मपुरी०३ अशा मदतनीस पदाच्या ३१ जागा असून या जागांसाठी ५१६ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
"सध्या बेरोजगारी असल्याने उच्चशिक्षित महिलांची मदतनीस म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका बढतीसाठी दोन वर्षे अनुभवाची अट रद्द करण्यात यावी."
- इम्रान इखलाख कुरेशी, विदर्भ विभागीय सचिव अंगणवाडी कर्मचारी सभा (मरा.)