स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - सुधाकर अडबाले
By साईनाथ कुचनकार | Updated: May 29, 2023 16:33 IST2023-05-29T16:32:30+5:302023-05-29T16:33:07+5:30
अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - सुधाकर अडबाले
चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०२२-२३ ची अंतिम संच मान्यता, विद्यार्थ्याचे वैध आधार जे स्टुडंट पोर्टलवर नोंदवलेले आहे. त्यावर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पटावर दाखल विद्यार्थी, स्टुडंट पोर्टलवर आधार अपलोड असणारे विद्यार्थी व स्टुडंट पोर्टलवर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या यात मोठी तफावत आहे. त्यामुळे संचमान्यतेत अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे व वर्ग तुकड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी शासनाकडे मागणी केली. अन्यथा, शिक्षकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
विद्यार्थी शाळेत उपस्थित असूनही किंवा दहावी, बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी असूनही केवळ आधार कार्ड वैध नाही, या कारणासाठी डावलणे व त्याव्दारे होणाऱ्या संचमान्यतेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कमी करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही घटकांवर अन्याय होऊन अनुदानित शाळा, तुकड्या बंद करण्याचा घाट घातला जात आहे. याला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध आहे, असे झाल्यास संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिला आहे.
शैक्षणिक सत्र २०२२-२३ ची अंतिम संचमान्यता, स्टुडंट पोर्टलवर पटानुसार दाखल विद्यार्थी संख्या किंवा आधार अपलोड असणारे विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन निश्चित करण्यात यावी व शाळांना विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यासाठी एक वर्षाची संधी द्यावी, जनजागृती करण्यासाठी शासनाने, शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार अडबाले यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.