पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन; डीजेमुक्त साजरीकरणावर यंदा राहणार भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:47 IST2025-08-06T18:46:49+5:302025-08-06T18:47:59+5:30

यंदा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य : जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत सूचना

Appeal for an eco-friendly Ganeshotsav; This year's focus will be on DJ-free celebrations | पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन; डीजेमुक्त साजरीकरणावर यंदा राहणार भर

Appeal for an eco-friendly Ganeshotsav; This year's focus will be on DJ-free celebrations

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
राज्य शासनाने गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सवाचा' दर्जा दिला आहे. त्यामुळे प्रबोधनात्मक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग व्हावे व पुरस्कार जिंकावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले. मंगळवारी (दि. ५) नियोजन सभागृहातील जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.


यावेळी अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिसपाटील, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष, मूर्तिकार, डीजे चालक मालक आदी उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, उत्कृष्ट गणेश मंडळांनी गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घाट निश्चित करून विसर्जनस्थळी पूर्ण व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने प्रथमोपचार व्यवस्था, औषधांची उपलब्धता चोख ठेवावी. परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना डॉ. व्यवहारे यांनी दिल्या.


डीजेमुक्त आवाहन
उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव, रक्तदान शिबिर, प्लास्टिक निर्मूलन, वृक्षारोपण, गरीब शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी केले.


अफवांकडे दुर्लक्ष करा
डीजेऐवजी लेझीम नृत्य, ढोल ताशे असे पारंपरिक वाद्ये वाजवावीत. गणेश मंडळांनी सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून गर्दीला आळा घालता येईल. प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा लक्षात येताच तत्काळ पोलिसांशी संपर्क करा, असेही बैठकीत सांगितले.


शांतता समिती सदस्य काय म्हणाले?

  • सण उत्सवादरम्यान वीज अखंडित सुरू ठेवावा.
  • डीजेचा आवाज मर्यादीत असावा
  • अंतर्गत रस्त्यांची तत्काळ डागडुजी करावी
  • मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
  • अफवा पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी
  • मूर्तीची उंची मर्यादेपेक्षा जास्त असू नये
  • जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर ध्वनीक्षेपक बंद ठेवावा
  • चांदा क्लब ग्राउंडवरच मूर्तीविक्री सुरू ठेवा
  • मिरवणुकीत लेझर लाइटवर बंदी आणावी
  • सजावटीत प्लास्टिक-थर्माकॉल वापरावर प्रतिबंध घालावा.

Web Title: Appeal for an eco-friendly Ganeshotsav; This year's focus will be on DJ-free celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.