भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवतीचा जागीच मृत्यू, दुसरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 16:05 IST2022-09-30T15:58:22+5:302022-09-30T16:05:20+5:30
राजुरा-सास्ती मार्गावरील घटना

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवतीचा जागीच मृत्यू, दुसरी गंभीर जखमी
सास्ती (चंद्रपूर) : एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील एक युवती ट्रकच्या खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरी युवती गंभीररीत्या जखमी झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राजुरा-सास्ती मार्गावरील धोपटाळाजवळ घडली.
राजुरा येथील विद्यार्थिनी प्रियंका विठ्ठल बोबडे (२०) व तिची मैत्रीण रामपूर येथील प्रणिता सोनेकर (२०) या दोघी आपल्या दुचाकीने चंद्रपूरहून राजुराकडे सास्तीमार्गे येत होत्या. प्रियंका बोबडे ही गाडी चालवत होती, तर प्रणिता सोनेकर ही मागे बसून होती. सास्तीमार्गे राजुऱ्याला येत असताना धोपटाळाजवळील मंदिराजवळ राजुराकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ४० एके ३१२५) दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोन्ही तरुणी दुचाकीवरून खाली पडल्या. त्यात मागे बसलेली प्रणिता सोनेकर ट्रकखाली येऊन चिरडल्या गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका बोबडे हिच्या पायाला दुखापत झाली असून ती गंभीर जखमी झाली आहे.
नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचालक मनोज रामचंद्र खैरे, रा. राजुरा याला ताब्यात घेतले. जखमी युवतीला रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.