शेतकऱ्यांकडून चालू पीककर्जाची ९० टक्के तर थकित पीककर्जाची झाली २ टक्के वसुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:40 IST2025-04-05T15:38:43+5:302025-04-05T15:40:06+5:30
शेतकऱ्यांना होती कर्जमाफीची प्रतीक्षा : थकीत पीक कर्ज डोक्यावरच

90 percent of current crop loans and 2 percent of outstanding crop loans have been recovered from farmers
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : मार्च महिना संपला आहे. तालुक्यातील विविध सोसायट्यांमार्फत करण्यात आलेल्या पीक कर्ज वसुलीचे आकडे समोर येत आहेत. माहितीनुसार सोसायट्यांनी चालू पीक कर्जाची वसुली ९० टक्के तर थकीत पीक कर्जाची वसुली केवळ २ टक्के केली आहे.
तालुक्यातील ३१ सोसायट्यांनी मागील वर्षी वितरण केलेल्या २६ कोटी ८० लाख ६९ हजार रुपयांपैकी ३१ मार्चपर्यंत २४ कोटी २८ लाख २४ हजार रुपयांचीच वसुली आली आहे. वसुलीची ही टक्केवारी २० टक्के आहे. मात्र थकीत असलेल्या २४ कोटी ३६ लाख ६७ हजार रुपयांपैकी केवळ ५२ लाख ८४ हजार रुपयांचीच वसुली आली आहे. वसुलीची ही टक्केवारी केवळ २ टक्के आहे. मार्च महिन्यात पीक कर्ज वसुलीस चांगलीच गती आली. आणि चालू पीककर्जाची चांगलीच वसुली आल्याची माहिती आहे.
३१ सोसायट्यांनी मागील वर्षी वितरण केलेल्या २६ कोटी ८० लाख ६९ हजार रुपयांपैकी ३१ मार्चपर्यंत २४ कोटी २८ लाख २४ हजार रुपयांचीच वसुली आली आहे.
धान पिकाच्या लागवडीसाठी येतो अधिक खर्च
नागभीड तालुक्यात थानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड केली जात असल्याची माहिती आहे. मात्र या पिकास मोठ्या प्रमाणावर आर्थिक लागतीची गरज असल्याने शेतकरी गावातील सेवा सहकारी सोसायट्या आणि आदिवासी विविध कार्यकारी सोसायट्या यांच्यामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पतपुरवठा घेत असतात.
शेतकरी द्विधा मनःस्थितीत
फेब्रुवारी महिन्यापर्यंत पीककर्ज वसूल न होण्यास सरकारचे धोरण कारणीभूत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी मोठी चर्चा झाली. सरकार कर्जमाफीची घोषणा नक्की करेल, असे अनेक शेतकऱ्यांना वाटत होते. अगदी अर्थसंकल्प अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहिली. मात्र सरकारने कर्जमाफी नाहीच अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी पीककर्ज जमा करण्यास सुरुवात केली.