शेतात गेलेल्या चिमुकल्याला बिबट्याने केले ठार; कोरपना तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:43 IST2022-12-26T17:41:37+5:302022-12-26T17:43:35+5:30
परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शेतात गेलेल्या चिमुकल्याला बिबट्याने केले ठार; कोरपना तालुक्यातील घटना
कोरपना (चंद्रपूर) : बेलगाव जामगुडा शेतशिवारात एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
नितीन आत्राम (९) असे मृत मुलाचे नाव असून तो आई-वडिलांसह शेतात काम करीत होता. भूक लागली म्हणून तो डबा घेण्यासाठी धुऱ्यावर आला असता अचानकपणे बिबट्याने हल्ला केला. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्याने मुलाला जंगलात फरफटत नेले.
दरम्यान, शेजारी जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे यांनी आरडाओरडा करून बिबट्याला पळवून लावले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सत्यजित आमले यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.