मरणयातना ; मूल तालुक्यात ३२ गावांना स्मशानभूमीच नाही, उघड्यावरच अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:50 IST2025-07-24T19:50:09+5:302025-07-24T19:50:56+5:30

पावसाच्या दिवसांत होते फजिती, नागरिकांमध्ये संताप : काही ठिकाणी नाही जाण्यासाठी रस्ता

32 villages in Mul taluka do not have a cemetery, cremations are done in the open | मरणयातना ; मूल तालुक्यात ३२ गावांना स्मशानभूमीच नाही, उघड्यावरच अंत्यसंस्कार

32 villages in Mul taluka do not have a cemetery, cremations are done in the open

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल :
तालुक्यातील ३२ गावांमध्ये आजही अंत्यसंस्कारासाठी योग्य जागेचा अभाव असून, मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना मरणानंतरही अपमानास्पद आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमी नसल्यामुळे गावाबाहेर उघड्यावर, नाल्याच्या काठावर किंवा खासगी जमिनींवर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की येत आहे.


मूल तालुक्यात एकूण ४९ ग्रामपंचायती असून, ८४ महसुली गावे आहेत. त्यापैकी केवळ ५२ गावांना स्मशानभूमीची अधिकृत जागा उपलब्ध आहे. उर्वरित ३२ गावे आजही या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची जागाच नाही आणि जिथे जागा आहे, तिथे शेडसारख्या सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


भरपावसात अंत्यसंस्कार करायचे तरी कसे ?
तालुक्यातील ५६ गावांमध्ये स्मशानभूमीवर शेडच नाही. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करताना नातेवाइकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मृतदेहाला अग्नी देताना ओलसर लाकडे, रस्त्यांची दुरवस्था आणि सततचा पाऊस यामुळे अंत्यसंस्कार करणं कठीण बनत आहे. त्यामुळे वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र उपयोग झाला नाही. 


निधीचा प्रश्न आणि प्राधान्यक्रमाचा अभाव
रस्ते, नाली बांधकामासाठी अधिक निधी खर्च केला जातो. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक शेड किंवा सुविधा पुरवण्यात प्राधान्य दिले जात नाही. ८४ गावांपैकी फक्त २८ गावांमध्येच स्मशानभूमी शेड आहे, ही स्थिती बदलणे आवश्यक आहे.


प्रशासनाची उदासीनता
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही अनेक गावांत स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नाही, ही बाब गंभीर असून यामागे प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे जाणवते. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्मशानभूमीच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.


या गावांना अजूनही स्मशानभूमी नाही
आकापूर, शिवापूर चक, पडझरी माल, भवराळा, भेजगाव, येसगाव, मानकापूर चक, दहेगाव, चकदुगाळा, कवडपेठ चक, चिरोली, हळदी तुकूम, फुलझरी, डोनी, काटवन चक, खालवस पेठ, सोमनाथ प्रकल्प, मोरवाही माल, मेटेगाव, मानकापूर, ताडभूज, कोळसा पुनर्वसन, नांदगाव, कोरंबी, चकघोसरी, चक बॅबाळ, राजोली, सिंताळा, सदागड, टोलेवाही, उथळपेठ, येरगाव.


"मूल तालुक्यात ३२ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. संबधित गावांना स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे."
- विनोद मेश्राम, विस्तार अधिकारी पंचायत समिती मूल

Web Title: 32 villages in Mul taluka do not have a cemetery, cremations are done in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.