चंद्रपुरातील १४ हजार युवकांना मिळणार थेट रोजगार; बारा कंपन्यांसोबत सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:08 IST2025-05-03T15:07:47+5:302025-05-03T15:08:15+5:30
पालकमंत्री अशोक उईके : पोलिस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण

14 thousand youths of Chandrapur will get direct employment; MoU signed with twelve companies
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहनअंतर्गत औद्योगिक परिषदेत १२ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. तब्बल १७ हजार ४१३ कोटींची गुंतवणूक आकर्षित झाली. यातून १४ हजार थेट रोजगारनिर्मिती होणार आहे. विकासाच्या मार्गावर जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प, विविध उद्योग, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, सैन्यासाठी लागणारी आयुधी निर्माणी आदींमुळे चंद्रपूर जिल्हा जागतिक पटलावर ओळखला जातो. ही ओळख कायम ठेवण्यात येईल. जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला. पहिल्या १०० दिवसांत सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाऊल टाकले. जिल्हा प्रशासनाने सात कलमी कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाअंतर्गत मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, संदीप छिद्रावार, विजय बोरीकर, रवींद्र हजारे, शुभांगी सूर्यवंशी, अनिलकुमार घुले, अमूल भुते, युधिष्ठिर रैच यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे चांदा पब्लिक स्कूल, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, महसूल अधिकारी प्रवीण ठोंबरे तसेच 'पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ' ब्रीदवाक्य स्पर्धेतील हिमांशू संजय वडस्कर, समृद्धी गुप्ता, चांदणी बलराम झा यांचा पालकमंत्री डॉ. उईके यांनी सत्कार केला.
३५ हजार घरकुलांचे भूमिपूजन; २० वाहनांचे लोकार्पण
पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी 'सर्वांसाठी घरे' अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत एकाच वेळी ३५ हजार लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन केले. यावेळी पोलिस विभागाच्या २० वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
मदत कक्षाचा उद्देश
गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देणे, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालय अंतर्गत उपचार, महात्मा जोतिबा फुले, आयुष्मान भारत योजना, जनआरोग्य योजनांची माहिती देणे, आरोग्य योजनेत समाविष्ट होऊ न शकणाऱ्या रुग्णांना कक्षातून मदत करण्यात येईल, अशी माहिती कक्षप्रमुख डॉ. कविश्वरी कुंभलकर यांनी दिली.
मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष
प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन केलेले मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकांऱ्यासह कक्षप्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभलकर, समाजसेवा अधीक्षक भास्कर शेळके, दीपक शेळके उपस्थित होते.