चंद्रपूरच्या मूल तालुक्यात वाघाने घेतला १३ वा बळी; शेतात काम करीत असताना केला अचानक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 16:27 IST2022-05-31T16:24:05+5:302022-05-31T16:27:51+5:30
मे महिन्यात १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केले होते. तर, १५ दिवसातच वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे.

चंद्रपूरच्या मूल तालुक्यात वाघाने घेतला १३ वा बळी; शेतात काम करीत असताना केला अचानक हल्ला
मूल (चंद्रपूर) : तालुक्यातील करवन येथील शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी सकाळी ८ च्या दरम्यान घडली. मूल तालुक्यात आत्तापर्यंत वाघहल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून ही १३ वी घटना आहे.
रामभाऊ कारू मरापे (४५) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. करवन सभोवतालचा परिसर संपूर्ण जंगलव्याप्त असून याभागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांना पोटाच्या भाकरीसाठी शेतात जाणे भाग पडते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे जंगलव्याप्त गावात शेती करणे कठीण होत असल्याची चर्चा करवन काटवन गावात आहे.
घटनेची माहिती मिळताच विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहायक जोशी, बिट वनरक्षक वासेकर, परचाके, हे घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वनविभागातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ २० हजारांची मदत देण्यात आली.
मे महिन्यात १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजीच आहे. तालुक्यात आजपर्यंत वाघाने १२ बळी घेतलेले असून रामभाऊ १३ वा बळी ठरला आहे. वन्यप्राणी - मानव संघर्ष बघता मानवावर हल्ला करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करून मानवाला संरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.