१३ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, 'तो' केवळ १५ वर्ष वयाचा; पालकांना बसला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 17:36 IST2022-07-09T10:58:39+5:302022-07-09T17:36:35+5:30
याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून, मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

१३ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, 'तो' केवळ १५ वर्ष वयाचा; पालकांना बसला धक्का
शंकरपूर (चंद्रपूर) : खेळण्या-बागडण्याच्या वयात १३ वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याची घटना घडली. ती गरोदर असल्याचे तिलाही स्वत:लाही माहिती नव्हते. पोट दुखत असल्याने आईने तिला दवाखान्यात नेले अन् धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
चिमूर तालुक्यातील एका गावात सातव्या वर्गात शिकणारी एक १३ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गर्भवती आहे. तर तिचा मित्र हा देखील अल्पवयीन, म्हणजे १५ वर्षांचा आहे. दोघांचे घर जवळच असल्याने या दोघांमध्ये प्रेमसंबंध व नंतर शारीरिक संबंध निर्माण झाले. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र, याची पुसटशी कल्पनाही त्या मुलीला आली नाही.
दरम्यान, सहाव्या महिन्यात तिचे पोट दुखत असल्याने आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. ज्या वयात आईची ममता कळत नाही त्या वयात ती आता आई बनणार आहे. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून, मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे, तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
साेशल मीडिया नकाे रे बाबा!
आधुनिक काळात मोबाइल, फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्युब अशा आधुनिक गोष्टी मुलांच्या हातात आल्या आहेत. मुले, मुुली नको त्या वयात नको त्या गोष्टी पाहायला लागले आहेत. साेशल मीडियाचाही अतिरेक हाेऊ लागला आहे. जिथे शिक्षणाची ओढ निर्माण व्हायला पाहिजे तिथे शारीरिक संबंधाकडे आकर्षण वाढू लागले आहे. यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थीदशेत असलेल्या पाल्यांना पालकांनी साेशल मीडियापासून दूर ठेवावे, अशा बाेलक्या प्रतिक्रिया यानिमित्ताने नागरिकांनी दिल्या.